आंदोलकांना नोटिसा : मोबाइल बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:10 AM2018-07-25T01:10:08+5:302018-07-25T01:10:24+5:30
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संघटनांच्या नेत्यांना नोटिसा बजावण्याबरोबरच त्यांचे मोबाइल कंपन्यांकडून त्यांच्या मोबाइलची सेवाच बंद केली आहे़
नाशिक : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संघटनांच्या नेत्यांना नोटिसा बजावण्याबरोबरच त्यांचे मोबाइल कंपन्यांकडून त्यांच्या मोबाइलची सेवाच बंद केली आहे़ पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली असली मराठा संघटनांच्या हुशार नेत्यांनी दुसरे सीमकार्ड घेऊन मोबाइल सुरू केला आहे़ मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू झाले असून, काही ठिकाणी या आंदोलनास हिंसक वळण लागले़ यामध्ये बसेस, ट्रक व वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली़, तर काही ठिकाणी मराठा संघटना शांततेत रास्ता रोको वा आंदोलने करीत आहेत़ शहरात वा ग्रामीणमध्ये कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे़ याबरोबरच शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत़ शहरातील मराठा संघटनाचे प्रमुख नेत्यांना पोलिसांनी यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत़ केवळ नोटिसांवरच पोलीस थांबलेले नसून या नेत्यांचे मोबाइल नंबरही संबंधित मोबाइल कंपन्यांना कळवून ते बंद करण्यात आले आहेत़ या नेत्यांचे मोबाइलनंबर डायल केल्यानंतर तो नंबरच लागत नाही, तसेच त्यांनाही कुणाला फोन करता येत नाही़ केवळ फोनच नव्हे तर त्यांचा सोशल मीडियाही ब्लॉक करण्यात आला आहे़ यामुळे या नेत्यांनी संपर्कात राहण्यासाठी दुसरे कार्ड घेण्याचा पर्याय निवडला आहे़
१४९ ची नोटीस
नाशिक शहरातील सकल मराठा क्रांती मोर्चाद्वारे नाशिक शहर व परिसराचे नेतृत्व करीत आहात़ शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडून शांतता भंग होईल, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, आंदोलनातील कार्यकर्ते वा सामान्य नागरिकांना इजा होईल, असे कृत्य करू नये अथवा होऊ देऊ नये, कृत्य करण्यास प्रोत्साहित करू नये, चिथावणी देऊ नये वा भडकवू नये़ असे कृत्य केल्यास आपणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिसीत म्हटले आहे़