शहरातील होर्डिंग्ज व्यावसायिकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:25 AM2018-10-23T01:25:47+5:302018-10-23T01:26:07+5:30
पुणे येथे होर्डिंग्ज रस्त्यावर पडून चार नागरिक ठार झाल्यानंतर नाशिक महापालिकेला आता जाग आली असून, त्यांनी सर्वच होर्डिंग्ज व्यावसायिकांना नोटिसा पाठवून कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहेत.
नाशिक : पुणे येथे होर्डिंग्ज रस्त्यावर पडून चार नागरिक ठार झाल्यानंतर नाशिक महापालिकेला आता जाग आली असून, त्यांनी सर्वच होर्डिंग्ज व्यावसायिकांना नोटिसा पाठवून कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने परवानगी दिलेल्या अनेक होर्डिंग्ज व्यावसायिकांकडूनही कागदपत्रे मागविण्यात आल्याने आता नव्याने कागदपत्रे मागण्याची गरज काय? असा प्रश्न केला जात आहे. गेल्या महिन्यात पुण्यात रेल्वे प्रशासनाच्या वतीने एक होर्डिंग्ज पाडताना दुर्घटना घडली होती. होर्डिंग्ज रस्त्यावर पडून चार प्रवासी ठार झाले होते. त्यामुळे धोकादायक होर्डिंग्जचा विषय ऐरणीवर आला. महापालिका आयुक्तांनी त्याचवेळी शहरातील बेकायदा होर्डिंग्ज शोधून नोटिसा देण्यास सांगितले होते, परंतु आता प्रशासनाने सर्वच होर्डिंग्ज व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यास प्रारंभ केला आहे. होर्डिंगसाठी महापालिकेने दिलेली परवानगी, तसेच होर्डिंग्जचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आणि अन्य प्रकारची माहिती मागविली आहे. या शिवाय महापालिकेच्या परवानगीशिवाय होर्डिंग उभारले असल्यास तसेच कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल? असा इशारा देण्यात आला आहे.