पॉसचा वापर न करणाऱ्या रेशन दुकानदारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:18 AM2019-01-28T01:18:18+5:302019-01-28T01:18:40+5:30
रेशनवरील धान्य वितरणात पॉस यंत्राचा वापर न करणाºया जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची माहिती संग्रहित करून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली असून, मुदतीत आपले म्हणणे समाधानकारक न मांडल्यास अशा दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्याची तयारी पुरवठा खात्याने सुरू केली आहे.
नाशिक : रेशनवरील धान्य वितरणात पॉस यंत्राचा वापर न करणाºया जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची माहिती संग्रहित करून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली असून, मुदतीत आपले म्हणणे समाधानकारक न मांडल्यास अशा दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्याची तयारी पुरवठा खात्याने सुरू केली आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यातच पॉस यंत्राचा वापर कमी झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे असून, त्यासाठी पुरवठा खात्याची तांत्रिक प्रणाली दोषी असल्याचा दावा केला जात
आहे.
संपूर्ण राज्यात गेल्या वर्षापासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील काळाबाजाराला आळा बसावा म्हणून रेशन दुकानातून धान्य वाटप करताना पॉस यंत्राचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील काही भागांत टप्पाटप्प्यात राबविण्यात आलेल्या पॉस यंत्रामार्फत धान्य वाटपात गेल्या सात महिन्यांत सातत्याने पॉस वापराच्या प्रमाणात कमालीची वाढ होत असतानाच, आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात रेशन दुकानदारांकडून पॉस यंत्राचा वापर कमी होऊ लागला असून, त्यामुळे रेशनमध्ये धान्य पडून राहत असल्याचे तर काही दुकानदारांनी मॅन्युएली पद्धतीने धान्य वाटपाला प्राधान्य दिल्याची बाब पुरवठा खात्याच्या निदर्शनास आली आहे.
नागरिकांचे स्थलांतर, तांत्रिक दोष कारणीभूत
पुरवठा खात्याच्या नोटिसांबाबत रेशन दुकानदारांनीही आपली बाजू मांडण्याची तयारी केली असून, ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांनी रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे अजूनही शिधापत्रिकेला आधारकार्डाशी जोडण्याची संगणकीय प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा दावा केला आहे.
पुरवठा खात्यात पुन्हा अस्वस्थता
रेशन दुकानदारांकडून धान्य वाटपात होत असलेल्या कमतरतेमुळे पुरवठा खात्यात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रत्येक दुकानदाराकडून आॅनलाइन वाटप होत असलेल्या धान्याची माहिती पुरवठा खात्याच्या सर्व्हरमध्ये दिसत असल्याने पुरवठा खात्याने आता पॉस यंत्राचा वापर न करता धान्य वाटप करणारे व धान्य वाटप कमी करणाºया दुकानदारांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.