नागरी बॅँकेच्या ‘त्या’ संचालकांना नोटिसा बजवा
By admin | Published: February 10, 2016 12:03 AM2016-02-10T00:03:25+5:302016-02-10T00:03:47+5:30
विभागीय सहनिबंधक बैठक : जिल्हा उपनिबंधकांना आदेश
नाशिक : मागील काळात बरखास्त झालेल्या बॅँकांमध्ये संचालक राहिलेल्या व आता नागरी बँकांवर संचालक असलेल्या संचालक व पदाधिकाऱ्यांना अपात्रतेसंदर्भात कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांनी काल मंगळवारी संबंधित जिल्हा उपनिबंधकांना दिल्याचे वृत्त आहे.
नाशिक विभागातील पाचही जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखा परीक्षकांची महत्त्वाची बैठक काल (दि. ९) विभागीय सहनिबंधक कार्यालयात सकाळी ११ वाजता झाली. या बैठकीत नियमित मासिक आढावा घेण्यात आला. तसेच राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार बरखास्त झालेल्या नागरी बॅँकांमध्ये निवडून आलेल्या संचालकांना अपात्र ठरविण्याबाबतच्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आल्याचे कळते. त्यात नाशिक जिल्हा बॅँकेत मागील काळात संचालक राहिलेल्या व आताही नागरी बॅँकांमध्ये संचालक अध्यक्षपदावर असलेल्या चौघांना नोटिसा बजावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.
जिल्ह्यात चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, त्याच धर्तीवर जळगाव, अहमदनगर, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतील नागरी बॅँकांमध्ये संचालक व पदाधिकारी असलेल्या मागील काळातील बरखास्त झालेल्या बॅँकांच्या संचालकांना नवीन निर्णयानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना विभागीय सहनिबंधकांनी दिल्याचे कळते. या बैठकीस पाचही जिल्ह्णातील
जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक तसेच जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बॅँकांचे कार्यकारी संचालक व व्यवस्थापक उपस्थित होते. (प्रतिनिधी)