नोव्हेंबरचे मृत्यूप्रमाण जूनपेक्षाही कमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:14 AM2020-12-06T04:14:55+5:302020-12-06T04:14:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण सप्टेंबरपर्यंत सातत्याने वाढत गेले. मात्र, ऑक्टोबरपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण सप्टेंबरपर्यंत सातत्याने वाढत गेले. मात्र, ऑक्टोबरपासून मृत्युदर कमी होऊ लागल्यानंतर नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण जून महिन्यापेक्षाही कमीच्या पातळीवर गेले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबळीची नोंद मालेगावला ८ एप्रिलला झाली होती, तर नाशिक महानगरातील पहिला कोरोनाबळी ५ मे तारखेला गेला होता. पहिल्या बळीच्या घटनेला साधारणपणे ७ महिन्यांचा कालावधी होत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील मृतांची महिनानिहाय संख्या, मृत्युदर आणि त्यातही महिला आणि पुरुषांचे प्रमाण यात सातत्याने वाढच होत गेली आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ४९३ बळींचे टोक गाठल्यानंतर ऑक्टोबरमध्ये मृतांच्या आकड्यात जवळपास दोनशेने घट होऊन ही संख्या ३०० वर आली, तर नोव्हेंबरमध्ये हेच प्रमाण थेट जून महिन्यापेक्षाही कमी म्हणजे १२१ वर आला आहे. हाच कल कायम राहिल्यास डिसेंबरमध्ये मृत्यूचे प्रमाण ५० पेक्षाही कमी होण्याची आशा आरोग्य विभागाला वाटू लागली आहे.
इन्फो
महिलांचा मृत्युदर निम्मा
जिल्ह्यात गत सात महिन्यांत झालेल्या मृत्यूमध्ये पहिल्या मृत्यूपासून आताच्या अठराशेवरील मृत्यूमध्ये पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण महिलांच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याचे दिसून येते. गत सात महिन्यांत अर्थात नोव्हेंबरपर्यंत एकूण ५२० महिलांचा मृत्यू झाला असून, पुरुष बळींची संख्या १२९३ वर पोहोचली आहे.
इन्फो
एकमेव वयोगटात महिला मृत्यू अधिक
वयोगटनिहाय मृत्यूमध्ये केवळ १३ ते २५ या वयोगटात मुलांचे मृत्यू ८, तर मुलींचे मृत्यू ११ झाले आहेत. बाकी अन्य वयोगटात सर्वत्र पुरुषांच्या मृत्यूचेच प्रमाण महिलांच्या मृत्यूच्या तुलनेत दुप्पट किंवा त्याहून अधिक असल्याचे दिसून येते. अर्थात, त्यामागे कामधंद्यासाठी किराणा, बँकिंगसह लहान-मोठ्या अनिवार्य खरेदीसाठी घराबाहेर पडावे लागण्याचे पुरुषांचे अधिक प्रमाण हेच कारणीभूत असण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जाते.
इन्फो
जिल्ह्यातील महिनानिहाय मृत्यू
एप्रिल महिन्यातील मृत्यू १२
मे महिन्यातील मृत्यू - ६०
जून महिन्यातील मृत्यू - १६६
जुलै महिन्यातील मृत्यू - २६७
ऑगस्ट महिन्यातील मृत्यू - ३७२
सप्टेंबर महिन्यातील मृत्यू - ४९३
ऑक्टोबर महिन्यातील मृत्यू - ३००
नोव्हेंबर महिन्यातील मृत्यू - १२१