आता बारा वर्षांनीच बहिष्काराची भाषा
By admin | Published: September 19, 2015 10:41 PM2015-09-19T22:41:20+5:302015-09-19T22:41:59+5:30
पर्वणी संपली : प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास
नाशिक : वर्षभरापूर्वी सिंहस्थ कामाने वेग घेतला आणि ज्यांच्यासाठी सोयी-सुविधा करण्याचे घाटत गेले, त्यांनी किरकोळ कारणावरून थेट सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाहीस्नानावरच बहिष्काराची भाषा केली. कधी साधू-महंतांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप, तर कधी कामे निकृष्ट होत असल्याने कुंभमेळ्यासाठी नाशिकला न येण्याचे अस्त्र उगारले गेले. पारंपरिकता व धार्मिकतेशी निगडीत असलेल्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू-महंत व लाखोंनी भाविक येणार असल्याने नसत्या बदनामीच्या भीतीने प्रशासन वारंवार झुकले, तर शासनानेही साधूंपुढे गुढगे टेकले. अगदी पर्वणीच्या पूर्वसंध्येपर्यंत मेळा अधिकाऱ्यांकरवी नाकदुऱ्या काढण्याचे काम केले गेले, पर्वणी पार पडली आता कुंभमेळा गुंडाळण्याचा जसा सोपस्कार बाकी आहे, तसाच ‘शाहीस्नान नही होंगा’ या निर्वाणीच्या बहिष्काराची भाषादेखील थेट बारा वर्षांनीच कानी पडणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तीनही पर्वण्या भर पावसाळ्यात येत असल्यामुळे त्याच्या नियोजनात व अन्य ठिकाणच्या कुंभमेळ्याच्या नियोजनात मोठा फरक आहे, त्यातच ज्या तपोभूमीत कुंभ भरतो त्याठिकाणी जागेची अडचण असल्याने अशी जागा ताब्यात घेण्यासाठी जागामालकांची मिनतवारी करणे दर कुंभाला ठरलेले, त्यातही प्रशासनाला जागेची असलेली निकड पाहून जागामालकांकडून होणाऱ्या जास्तीच्या मोबदल्याची मागणी व तो न मिळाल्यास थेट न्यायालयात प्रकरण ढकलून कालापव्यय ठरलेला. अशा परिस्थितीतही जागा ताब्यात घेतल्यानंतर त्यावर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र असे कामे करताना निव्वळ विश्वासात घेतले नसल्याचे कारण पुढे करून वर्षभरापासून साधू-महंतांनी वेळोवेळी बहिष्काराची भाषा वापरून प्रशासनातील अधिकाऱ्यांची दमछाक केली. ज्या ज्यावेळी बहिष्काराची धमकी देण्यात आली, दुसऱ्याच दिवशी सारेच हादरू लागले, बैठकांवर बैठका व व्यवस्थित काम करण्याच्या आश्वासनांचा भडिमार होऊ लागला. कोपलेले साधू-महंत दुसऱ्याच क्षणी गप्पगार होऊ लागले. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम वेळेत पार पाडण्याचे आव्हान व दुसरीकडे साधू-महंतांची सरबराई करण्याचा हा खेळ साधारणत: वर्षभर कायम राहिला. मग कधी जागावाटपावरून रूसवा फुगवा राहिला, तर आखाडे, खालशांना पुरेशा सुविधा दिल्या नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यात मानापमानामुळे बहिष्कारही टाकण्यात आला, तर आखाड्यांच्या अंतर्गत वादातूनही प्रशासनालाच वेठीस धरण्यात आले. एवढे सारे करूनही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मौन पाळून समजूतदारपणाचीच भूमिका घेतली.
शुक्रवारी नाशिकच्या कुंभमेळ्याची अखेरची पर्वणी पार पडत असतानाही झालेल्या गोंधळातून शासन-प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना साधू-महंतांची मिनतवारी करावी लागली. एकदाचे स्नान आटोपले, साधू-महंत आखाड्यात परतले. आता तसे पाहिले तर त्यांच्या परतीचे वेध सुरू झाले. कुंभमेळा समाप्तीची जशी फक्त औपचारिकता बाकी राहिली तशीच त्याबरोबर थेट बारा वर्षांपर्यंत बहिष्काराची भाषाही हवेत विरली.