आता ‘एअर अॅम्बुलन्स’ही नाशिककरांसाठी धावणार विमानतळाचा फायदा : अवयवदानासाठी उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:05 AM2017-12-29T01:05:38+5:302017-12-29T01:06:30+5:30
विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने आता एअर अॅम्बुलन्सच्या विषयालादेखील चालना मिळाली असून, एका खासगी कंपनीने तसा प्रस्ताव इंडियन मेडिकल असोसिएशनकडे गुरुवारी (दि. २८) सादर केला.
नाशिक : विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने आता एअर अॅम्बुलन्सच्या विषयालादेखील चालना मिळाली असून, एका खासगी कंपनीने तसा प्रस्ताव इंडियन मेडिकल असोसिएशनकडे गुरुवारी (दि. २८) सादर केला. कंपनीच्या प्रस्तावाबाबत आयएमएच्या कार्यकारिणीत चर्चा होणार असली तरी अशाप्रकारच्या सेवांचा पर्याय उपलब्ध झाल्यास दुर्धर आजाराच्या रुग्णांबरोबरच अवयवदानासाठी मदत होणार होईल आणि ग्रीन कॉरिडोरला पर्याय उपलब्ध होणार आहे.
नाशिकमध्ये एअर अॅम्बुलन्सची सेवा सुरू करण्याबाबत वेळोवेळी चर्चा झाली आहे. कुंभमेळ्याच्या दरम्यान महामार्गावर किंवा अन्य कोठेही दुर्घटना घडली तर त्यावेळीदेखील संबंधितांना तातडीने उपचार मिळावे यासाठी एअर अॅम्बुलन्सची शक्यता पडताळली गेली होती, मात्र आता पर एअर या कंपनीने नाशिकला एअर अम्बुलन्स गरजेनुसार उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. नाशिकचे ओझर विमानतळ पूर्वीपासून उपलब्ध होतेच, नुकतीच एअर डेक्कनने विमानसेवा सुरू केली असून त्यामुळे एअर अॅम्बुलन्सलाही या विमानतळाचा वापर करता येणार आहे, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी आयएमएला सांगितल्याचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी सांगितले.
कंपनीने दोन प्रकारच्या अॅम्बुलन्सचे प्रस्ताव दिले असून त्यानुसार ७० हजार व १ लाख १० हजार रुपये असे दर दिले आहेत. मुंबईहून अन्य महानगरांसाठी जोडणारी एअर अॅम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचाही कंपनीचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात नाशिकमधील वैद्यकीय व्यावसायिकांना याबाबत अवगत करून देण्यात येणार आहे. यावेळी गिरीश मोहिते उपस्थित होते. अर्थात हा फक्त प्रस्ताव असून, नाशिकमध्ये अन्य अनेक कंपन्यादेखील अशी सेवा देण्याच्या तयारीत आहे.