महापालिकेच्या शाळांसाठी आता अक्षयपात्र योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:43 AM2018-11-16T01:43:23+5:302018-11-16T01:43:40+5:30
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळावा, यासाठी आता एका खासगी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अक्षयपात्र योजना राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शुद्ध तुपातील चांगले सकस आणि चविष्ट पदार्थ २३ हजार मुलांना मिळणार आहे.
नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळावा, यासाठी आता एका खासगी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अक्षयपात्र योजना राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शुद्ध तुपातील चांगले सकस आणि चविष्ट पदार्थ २३ हजार मुलांना मिळणार आहे.
महापालिकेचे शिक्षण मंडळाचे नूतन प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात एका खासगी संस्थेने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र दिले आहे. त्याचा अभ्यास करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शासनाच्या धोरणानुसार महापालिकेच्या ९० शाळांमधील २३ हजार विद्यार्थ्यांना बचत गटांमार्फत आहार दिला जातो. मात्र, बंगळुरू, दिल्ली आणि ठाणे यांसह विविध भागात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या धर्तीवर या संस्थेच्या माध्यमातून चविष्ट सकस आणि गरम भोजन देण्याचा प्रस्ताव संबंधित संस्थेने मांडला आहे. सुधा मूर्ती यांच्या प्रेरणेने गेल्या पंधरा वर्षांपासून बंगळुरूसह अनेक भागात याप्रकारे प्रकल्प राबविला जात आहे. नाशिकमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून अशाप्रकारे अक्षयपात्र योजना राबविण्यासाठी यापूर्वी प्रयत्न झाले होते, मात्र त्यावेळी बचत गटांच्या रोजगारावर गंडांतर येईल म्हणून या योजनेला विरोधही झाला होता. परंतु आता मात्र ही योजना राबविताना बचत गटांना सामावून घेऊन योजना राबविली जाणार आहे. संंबंधित संस्थांच्या अधिकाºयांनी तयारी दर्शविली आहे. शासकीय अनुदानापेक्षा जास्त रक्कम खर्च करून संंबंधित सेवाभावी संस्था पोषण आहार पुरवणार आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त प्रयत्न करीत आहेत.
पटसंख्या वाढीसाठी उपआयुक्त
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सध्या विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून खिचडी आणि तत्सम आहार दिला जातो. परंतु अक्षयपात्र सारखी योजना राबविल्यास आणखी मुलांची संख्या वाढू शकते, असा प्रशासनाला विश्वास वाटत आहे त्या दृष्टिकोनातून ही योजना राबविली जाणार आहे.