आता जनावरांचीही ऑनलाइन खरेदी-विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:56+5:302021-07-07T04:16:56+5:30
चांदोरी (आकाश गायखे) : डिजिटल इंडियाचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सर्वच क्षेत्रात सुरू आहे. बाजारपेठेप्रमाणेच आता जनावरांचीही खरेदी-विक्रीही ऑनलाइन पद्धतीने सुरू ...
चांदोरी (आकाश गायखे) : डिजिटल इंडियाचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सर्वच क्षेत्रात सुरू आहे. बाजारपेठेप्रमाणेच आता जनावरांचीही खरेदी-विक्रीही ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.
कोरोना काळात गुरांचे आठवडी बाजार बंद पडल्याने बळीराजा आता गुरांच्या ऑनलाइन बाजारात सक्रिय झाला आहे. बळीराजाही ऑनलाइन पद्धतीने गुरांची ऑनलाइन खरेदी-विक्री करताना दिसून येत आहे. समाजमाध्यमांवर शेकडो ग्रुप तयार झाले असून, आता विविध जाहिरातींसारखीच गाई-म्हैस बैलांचीही जाहिरात फोटो आणि व्हिडीओद्वारे प्रसिद्ध केली जात आहे.
मोबाइलवर पीक पाणी, औषधे, बी-बियाण्यांची माहिती आणि चित्र पाहता-पाहता, आता गुरांची खरेदी-विक्रीही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजा ऑनलाइन, व्यवहारात ओढला गेला आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र हाहाकार चाललेला असताना, बळीराजाच्या गरजेचा व दैनंदिन कामकाजात आवश्यक असलेले गुरांचे आठवडी बाजार बंद पडले. शेतीच्या कामांसाठी गुरांची गरज असली, तरी खरेदी-विक्री होत नव्हती. बाजार बंद असल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता. या बंदवर तोडगा काढण्यासाठी काही दलाल आणि शेतकऱ्यांनी मिळून व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले.
यामध्ये शेतकरी, व्यापारी आणि दलाल यांचा समावेश असतो. समूहावर फोटो टाकून ज्याला आवडला त्याच्याशी थेट फोन वरती बोलणे होते. भाव ठरतो आणि वाहन घेऊन थेट शेतातून किंवा घरातून जनावर घेऊन येतात. डिजिटल इंडियाचा हा फायदा शेतकऱ्यांना चांगलाच भावला आहे. कोरोनाने शेतकऱ्यांना डिजिटल इंडियातील हा ऑनलाइन खरेदीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे दिवसभराची फिरस्ती आणि दगदग टाळली जात असून, थेट मालकाशी व्यवहार होत असल्याने बळीराजाचा फायदाच होत आहे. आता हा ऑनलाइन खरेदी व्यवहार बळीराजाच्याही अंगवळणी पडला असून, त्याला सोयीचा झाला आहे. शेतात आखाड्यावर बसूनच आपल्याला हवे असणारे जनावर त्याला पसंत करता येत आहे.
-------
घरून मोबाइलवर फोटो पाहून, व्हिडीओ पाहून वासरी विकत घेतली. ७ हजार रुपये तिचा भाव ठरला. खेडेगावातील गावातील एका शेतकऱ्याची वासरी सोशल मीडियाच्या माध्यमातून विकत घेतली. यात दलाल नाही. हा ऑनलाइन खरेदीचा व्यवहार शेतकऱ्यांना लाभदायक ठरतोय.
--------- ऋषिकेश ठाणगे, शेतकरी