नाशकात आता आॅटो ‘आॅनलाइन’
By admin | Published: September 27, 2015 12:07 AM2015-09-27T00:07:43+5:302015-09-27T00:08:08+5:30
टॅक्सी कंपन्यांशी स्पर्धा : स्पर्धात्मक दरामुळे नागरिकांचा फायदा
नाशिक : प्रवासी वाहतुकीसाठी अॅपद्वारे आॅनलाइन टॅक्सी मागविण्यासाठी नोंदणी करण्याच्या व्यवसायापाठोपाठ आता ‘आॅनलाइन आॅटोरिक्षा’ सुरू होणार आहे. एका खासगी कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या १ आॅक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कमी दर आकारण्यासाठी स्पर्धा सुरू असून, टॅक्सी सेवेपेक्षा कंपनी कमी दर आकारणार असल्याचे सांगण्यात आल्याने ग्राहकांना मात्र फायदाच होणार आहे.
नाशिक शहरात खासगी प्रवासी वाहतुकीसाठी केवळ आॅटोरिक्षाच होत्या. त्यानंतर गेल्यावर्षीपासून ‘ओला’ आणि ‘टॅक्सी फॉर शुअर’ या दोन कंपन्यानी शहरांतर्गत टॅक्सी सेवा सुरू केली. पाठोपाठ उबेरही ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली. शहरात टॅक्सीसेवेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. रिक्षात कोंबून बसून प्रवास करण्यापेक्षा टॅक्सीचा प्रवास सुखकर असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अर्थात, यानंतरही रिक्षाच्या प्रवासी संख्येत फार घट झालेली नाही. परंतु आता आॅटोरिक्षांची आॅनलाइन सेवा सुरू होत आहे. जुगनू या कंपनीची ही सेवा असून, ही कंपनी मात्र स्थानिक रिक्षाचालकांना सहभागी करून घेणार आहे. कंपनीची स्वत:ची एकही रिक्षा नाही, स्थानिक पाचशे रिक्षाचालकांच्या मदतीने सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मनप्रितसिंग यांनी सांगितले. कंपनीची स्पर्धा ही रिक्षाचालकांशी नाही फार ती टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांशी असेल, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये खासगी प्रवासी टॅक्सींनी स्पर्धात्मक दर ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर आॅटोचे दरही स्पर्धात्मक असतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)