आता महापालिकेतही दुरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटनांचे बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 08:53 PM2021-02-24T20:53:50+5:302021-02-25T01:26:13+5:30
नाशिक- महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या योजनांच्या अथवा कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचे बार उडविणे कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आता दुरदृष्य प्रणाली आणि अन्य अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई, दिल्लीतील नेत्यांकडून थेट उद्घाटने करण्याची चाचपणी सुरू आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने अशा अनेक योजनांचे भूमिपूजन किंवा अन्य कार्यक्रम आभासी आणि दुरदृष्यप्रणालीद्वारे झाले आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेच्या अनेक योजनांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. सत्तारूढ भाजपाने मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील नियोजित उड्डाणपुलाचे भूमिपूजन, बससेवेचे उद्घाटन, बस आगाराचे भूमिपूजन, कानेटकर उद्यानाचे नूतनीकरण आणि अन्य अनेक कामांचा प्रारंभ करण्याचे नियोजन केले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ फेब्रुवारीस काही प्रारंभ आणि भूमिपूजन करण्याचे ठरविले होते. मात्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. आता कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द होत असून त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. त्यामुळे आता अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे. भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी महापालिकेच्या आयटी सेलबरोबर यासंदर्भात प्रेझेंटेशन देखील तयार केले आहे.
महापालिकेच्या वतीने उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी दोन ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. आता या पुलांच्या कामावर देखभाल करण्यासाठी पीएमसी म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच, आणखी एक ठेकेदार कंपनी सुपरव्हीजनसाठी नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेने आता निविदा मागवल्या आहेत.