आता नाशिकमधून वर्षभरासाठी कार्गो सेवा शक्य
By admin | Published: September 2, 2016 10:57 PM2016-09-02T22:57:42+5:302016-09-02T23:00:51+5:30
शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक : बदल्यात विदेशी फळांची आयात करणार
नाशिक : हॉल्कॉनच्या कार्गोसेवेचा वापर करीत नाशिकमधून शेळ्या-मेंढ्यांची शारजाला निर्यात झाल्यानंतर आता या सेवेचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र शेळ्या-मेंढ्यांची वर्षभर निर्यात करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात असून, त्या माध्यमातून विदेशी फळांची आयात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नाशिकमध्ये ओझर येथील एचएएल आणि कॉनकॉर यांची संयुक्त कंपनी असलेल्या हॉल्कॉनमध्ये हवाईमार्गाने माल वाहतुकीची सेवा उपलब्ध आहे. मात्र २०११ मध्ये या सेवेसाठी सर्व तयारी करूनही आजवर येथून थेट हवाईमार्गे माल पाठविला जात नव्हता. नाशिकच्या काही उद्योजकांचा माल येथून कंटेनरने मुंबईला आणि तेथून विमानाने अन्य देशांत पाठविला जात असे. मात्र, नाशिकमधील सानप अॅग्रोनिमलने प्रथमच धाडस करीत थेट विमान भाड्याने नाशिकला आणून हॉलकॉनच्या कार्गाेसेवेचा वापर सुरू केला आणि पडित असलेल्या हॉलकॉनच्या बेसला उजाळा मिळाला. या घटनेनंतर हॉलकॉनकडे शेकडो उद्योजकांकडून मालवाहतुकीची विचारणा होत आहे. मात्र प्रत्यक्षात अशी वाहतूक सहज सोपी नसल्याचे हॉलकॉनचे म्हणणे आहे, तर गेल्या २७ तारखेला पंधरा हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात करणाऱ्या सानप अॅग्रोनिमल्सने आता कार्गोविमान सेवेच्या कंपनीशी वर्षभरासाठी कंत्राट करण्याची तयारी सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत दर आठवड्याला कार्गो विमान शारजाला जाणे शक्य असून, त्यातून आखाती देशात शेळ्या-मेंढ्या पुरवण्याची योजना आहे. आखाती देशात असलेली मागणी आणि विमानातून अवघ्या तीन तासांत माल पोहोचवण्याची झालेली व्यवस्था यामुळे गुजरातच्या कांडला बंदरावरून होणारी जीवंत जनावरांची वाहतूक नाशिकमार्गे स्थलांतरित होण्याची शक्यता असून, नाशिक हे प्रमुख केंद्र बनणे शक्य असल्याचे कंपनीचे संचालक हेमंत सानप यांनी सांगितले.
शारजावरून नाशिककडे येणारे विमान रिकामे असते. केवळ शेळ्या-मेंढ्यांच्या वाहतुकीसाठी रिकामे पिंजरे आणले जातात. मात्र आता या रिकाम्या विमानातून इजिप्त किंवा अन्य देशांतील फळे नाशिकमार्गे भारतात पुरविणे शक्य असल्याचेही सानप यांनी सांगितले. कार्गोसेवेसाठी विमान कंपनीशी वर्षभराचा करार केल्यास कंपनी दर कमी करण्यास तयार असून, त्यामुळेच नाशिकमधून वर्षभर कार्गोसेवा देण्याची तयारी असल्याचे सानप यांनी सांगितले.