नाशकात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता चार्जिंग स्टेशन
By Suyog.joshi | Published: September 8, 2023 06:38 PM2023-09-08T18:38:11+5:302023-09-08T18:38:23+5:30
सहा कंपन्या रेसमध्ये : फेरनिविदांची तांत्रिक तपासणी
नाशिक (सुयोग जोशी) : इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका यांत्रिकी विभागाने पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राबविलेल्या फेरनिविदेत सहा कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असून या निविदा खुल्या करून त्यांची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. त्यात कंपन्या पात्र ठरल्या नाहीतर पुन्हा फेरनिविदा काढाव्या लागेल.
मागील वेळेस निविदा प्रक्रियेतील सातही कंपन्या तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्या होत्या. शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीतून खरेदी केली जाणारी वाहने इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. याकरिता इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देताना जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी दिल्ली येथील यूएनडीपीने देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात नाशिक महापालिकेचा समावेश असून शहर हद्दीत तब्बल १०६ चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे.
महापालिकेने पहिल्या टप्प्यात वीस ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मागील एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यात प्रारंभी टाटा, रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते; पण नंतर त्यांनी माघार घेतली. पहिल्या निविदा प्रक्रियेत सात कंपन्या सहभागी झाल्या होत्या. दीड महिने या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली; परंतु, सर्व कंपन्या तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्या. त्यामुळे महिनाभरापूर्वी विद्युत विभागाने फेरनिविदा राबवली. त्यात सहा कंपन्या मैदानात आहेत. दरम्यान, चार्जिंग स्टेशनसाठी ज्या इच्छुक कंपन्यांनी भरलेल्या कागदपत्रांपासून ते इतर तांत्रिक बाजू तपासल्या जाणार आहे.
या कंपन्या सहभागी
मनीष फ्लोअर मिल प्रा.लि.
झिहा इंटरनॅशनल प्रा.लि.
अनक्यु एंटरप्रायजेस
टेक सो चार्ज झोन
छबी इलेक्ट्रिकल प्रा.लि.
निना हॅण्डस
पहिल्या टप्प्यातील चार्जिंग स्टेशन
शहरातील अमृतधाम फायर स्टेशन-पंचवटी, फायर स्टेशन-सातपूर, राजे संभाजी स्टेडियम- नवीन नाशिक, कृषी नगर जॉगिंग ट्रॅक- ना. पश्चिम, बी.डी. भालेकर शाळेमागील पार्किंग, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, मनपा खुली जागा, लेखानगर मनपा मैदान अंबड लिंकरोड आदी ठिकाणी चार्जिंग स्टेशन होणार आहेत.
शहरातील प्रस्तावित चार्जिंग स्टेशनकरिता फेरनिविदा प्रक्रियेत सहा कंपन्यांनी सहभाग घेतला. आता कागदपत्रांची तांत्रिक तपासणी केली जाईल.
-उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, नाशिक मनपा