आता कोरोनाबाधिताची इमारत फक्त सील होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:32 PM2020-05-21T21:32:36+5:302020-05-21T23:29:55+5:30
नाशिक : एखाद्या भागात कोरोनाबाधित आढळला की, यापूर्वी पाचशे मीटर क्षेत्र सील केले जात असे. परंतु आता मात्र नव्या नियमानुसार बाधित रुग्ण राहात असलेल्या सदनिकेची इमारत अथवा जास्तीत जास्त त्यांची संपर्क साधने शोधून तेवढाच भाग सील करण्यात येणार असल्याने आता अन्य नागरिकांना क्वॉरंटाइन व्हावे लागणार नाही.
नाशिक : एखाद्या भागात कोरोनाबाधित आढळला की, यापूर्वी पाचशे मीटर क्षेत्र सील केले जात असे. परंतु आता मात्र नव्या नियमानुसार बाधित रुग्ण राहात असलेल्या सदनिकेची इमारत अथवा जास्तीत जास्त त्यांची संपर्क साधने शोधून तेवढाच भाग सील करण्यात येणार असल्याने आता अन्य नागरिकांना क्वॉरंटाइन व्हावे लागणार नाही.
शहरात सर्व प्रथम गोविंदनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बाधिताच्या घरापासून तीन किलोमीटर क्षेत्रातील सर्व परिसर सील केला होता. चौदा दिवस हा भाग प्रतिबंधित केल्यानंतर परिसरातील नागरिकांना बाहेर येण्यास आणि बाहेरील नागरिकांना आत जाण्यास मनाई करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे भाजीपाला आणि दूध या सेवादेखील बफर्स झोनमध्येच देण्यात आल्या होत्या. दरम्यान, त्यानंतर मात्र महापालिकेने अन्य बाधितांच्या पाचशे मीटर परिसरात निर्बंध घालण्याचे धोरण अवलंबले. तर काही ठिकाणी संबंधित बाधित मालेगाव किंवा अन्यत्र कर्तव्यावर असल्याने तो पंधरा दिवस घरीच नव्हता किंवा केवळ रात्री घरी झोपण्यासाठीच येत असलेल्या बाधिताच्या घराजवळील जेमतेम शंभर मीटर परिसरच सील करण्याचे धोरण अवलंबले होते.
कोरोनाबाधितचा सोसायटीत फार कोणाशी संपर्क नसेल तर किंवा तो बाहेरही पडला नसेल तरी चौदा दिवसांपर्यंत शंभर ते पाचशे मीटर भागातील नागरिकांना अकारण घरात अडकून पडावे लागत होते. त्यामुळे एका रुग्णामुळे परिसरातील नागरिकांनाही नसता मनस्ताप सहन करावा लागत होता. चौदा दिवसांत त्या भागात बाधित रुग्ण न आढळल्यास आयुक्त हा भाग प्रतिबंधित क्षेत्र नसल्याचे घोषित करतात.
आता शासनाच्या सुधारित निर्णयाने अशा सर्वच नागरिकांची सुटका केली आहे. बाधित रुग्णाच्या दैनंदिन संपर्काचा अंदाज घेऊन त्याचे घर असलेली इमारत किंवा अगदी पन्नास मीटरपर्यंतच परिसर सील करता येऊ शकेल, असे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले. त्यामुळे बाधिताच्या घराच्या परिसरातील नागरिकांना अकारण अडकून पडावे लागणार नसून, त्यांची यातून सुटका करण्यात आली आहे.
------------------------------
शहरात २३ प्रतिबंधित क्षेत्रे
४नाशिक शहरात अनेक भागात कोरोनाबाधिताच्या परिसरात चौदा दिवस अन्य बाधित न आढळल्याने असे क्षेत्र प्रतिबंधित न ठेवता मुक्त करण्यात आले आहे. आत्तापर्यंत १३ प्रतिबंधित क्षेत्रे रद्द करण्यात आली आहेत. तर २३ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे कायम आहेत. सोमवारपर्यंत (दि.१९) २२ क्षेत्रे होती. मंगळवारी (दि. २०) थत्तेनगर भागात बाधित आढळल्याने तेथील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.