आता कानात बुरशी, बॅक्टेरियाचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:24+5:302021-06-28T04:11:24+5:30
नाशिक : पावसाळ्यात ज्या व्यक्तींना अधिक काळ पावसात भिजत काम करावे लागते किंवा कोणत्याही कारणास्तव प्रदीर्घ काळ पाण्यात राहावे ...
नाशिक : पावसाळ्यात ज्या व्यक्तींना अधिक काळ पावसात भिजत काम करावे लागते किंवा कोणत्याही कारणास्तव प्रदीर्घ काळ पाण्यात राहावे लागते, अशा व्यक्तींना पावसाळ्यात किंवा त्यानंतरच्या काळात संबंधितांना कानात बुरशी किंवा बॅक्टेरियाचा धोका दिसून येतो.
सध्या विविध आजारांसह कानदुखीच्या तक्रारी अनेक घरांमध्ये दिसून येत आहेत. पावसात दीर्घकाळ भिजणाऱ्यांना कानात बुरशी होण्याचे प्रमाण वाढत असून नेहमीच्या सवयीप्रमाणे कानात औषध टाकणे अथवा ती बुरशी काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या रुग्णांना त्यापासून अधिक धोका असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात हौसेने भिजणे होत असले तरी त्यानंतर छत्री, रेनकोट यांचा आधार घेतला जातो. अचानक हवेत आलेल्या गारव्यामुळे सर्दी होते, तर वाढलेल्या सर्दीमुळे तापाची साथ पसरते, साचलेल्या पाण्यामुळे डास, माशा यांचा प्रादुर्भाव वाढतो आणि मलेरियासारख्या आजारांची लागण होते. मात्र पावसात भिजल्यामुळे कानदुखी होण्याची अनेक उदाहरणे यंदा दिसून येत आहेत. मात्र अद्यापही कानदुखीसारख्या रोगाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दुर्लक्षामुळे हा धोका अधिक वाढण्याची भीती आहे. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे सध्या दिसून येत आहेत. कानातील ओलावा अथवा साठणारे पाणी अशी स्थिती बुरशीच्या वाढीस पोषक असते. त्यावर योग्य उपचार न झाल्यास कानाच्या वेदना असह्य होतात. बुरशीच्या वाढीमुळे कानदुखीचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या वाऱ्या करत आहेत. त्यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण अधिक असून पावसात काम, प्रवास करणाऱ्या रुग्णांनाही त्याचा धोका अधिक आहे.
-------------------
ओटिटिस म्हणजेच कानाला होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. सर्व वयोगटातील लोकांमध्ये कानात बुरशी होण्याचा त्रास पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे कान सतत दुखत राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नका. कानाच्या दुखण्यावर वेळीच निदान व उपचार झाल्यास कान लवकर बरा होऊ शकतो.
तसेच ऑटोमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. या आजारात मुख्यतः कानाला संसर्गाचा धोका अधिक असतो. बुरशीजन्य कानात होणारे संक्रमण मुख्यत: कानाच्या क्षमतेवर परिणाम करते. दूषित पाण्यात पोहणे, कानाला आघात होणे, अधिकाधिक काळ पाण्यात राहणे आणि मधुमेह या कारणांमुळे कानाला संसर्ग होऊ शकतो. कानात पाणी शिरणे अथवा वेळेत ते काढले न जाणे यामुळे कानात बुरशी होण्याची अनेक उदाहरणे सध्या दिसून येत आहेत.
कान लाल होणे, श्रवणशक्ती कमी होणे, कानाच्या आतील त्वचा खराब होणे, कान दुखणे, जळजळ व सूज येणे, कानाच्या त्वचेला रॅश येणे आणि कानात तयार झालेला मळ बाहेर न पडणे ही कानाला बुरशी संसर्ग झाल्याची लक्षणे आहेत. बुरशीच्या वाढीमुळे कानदुखीचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत आहेत. बुरशी होणे हा गंभीर रोग नसला तरी त्याकडे वेळीच लक्ष देऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. अन्यथा घरातील चुकीच्या उपचारांमुळे बुरशीची वाढ झपाट्याने होऊन समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
-----------------
कानाचे नियमित निरीक्षण करणे, आंघोळ करताना रोज करंगळीने कान स्वच्छ करणे, तसेच कोणत्याही प्रकारची कानदुखी, संसर्ग किंवा कानापाशी रॅश येत असल्यास कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वत: कोणताही निर्णय घेऊन घरगुती उपाय करून कानाचे नुकसान करू नये. संबंधितावर आवश्यकतेनुसार डॉक्टर उपचार करतील.
----------------
ही डमी आहे.