अब दिल्ली दूर नही...! : नाशिककरांना थेट विमानसेवा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:56 AM2018-06-16T00:56:04+5:302018-06-16T00:56:04+5:30
देशाच्या राजधानीत जाण्यासाठी नाशिककरांना थेट विमानसेवा उपलब्ध झाली असून, दोन तासात तेथे पोहोचता येणार असल्याने ‘अब दिल्ली दूर नही’ अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या ओझर विमानतळावरून ही सेवा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला.
नाशिक : देशाच्या राजधानीत जाण्यासाठी नाशिककरांना थेट विमानसेवा उपलब्ध झाली असून, दोन तासात तेथे पोहोचता येणार असल्याने ‘अब दिल्ली दूर नही’ अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकच्या ओझर विमानतळावरून ही सेवा सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत प्रादेशिक हवाई सेवा जोडणीचा भाग म्हणून नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे अशी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. दुसºया टप्प्यात देशातील विविध भागांना जोडण्यासाठी सहा विमान कंपन्या दिल्ली, गोवा, हैदराबाद, गाझीयाबाद, अहमदाबाद अशा सेवा सुरू करणार आहेत. जेट एअरवेजने ही सेवा सर्वप्रथम सुरू करून आघाडी घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर नाशिककरांनी वेळेची बचत होण्यासाठी दिल्ली विमानसेवेला प्राधान्य दिले होते. शुक्रवारी (दि. १५) ओझर विमानतळावर या विमानसेवेचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यवा कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. नाशिकच्या विमानसेवेमुळे जिल्ह्णाच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे ही सेवा सुरू राहण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी सांगितले. औद्योगिक, कृषी उत्पादने आणि धार्मिक शहर म्हणून नाशिक शहराचे महत्त्व असून, सात ते आठ जिल्ह्णांच्या दृष्टीने नाशिक हे मध्यवर्ती शहर आहे. त्यामुळे विमानसेवेची गरज ही सर्व घटकांसाठी उपयुक्त ठरेल तसेच नाशिकच्या विकासालाही यामुळे चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनीदेखील विमानसेवा सुरू होत असल्याने नाशिकच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळेल. तसेच यापूर्वीच्या विमानसेवेचा विचार करता ही सेवा निरंतर सुरू ठेवण्यासाठी उद्योग क्षेत्र प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी नाशिकहून सुरू होणारी नाशिक-दिल्ली विमानसेवा ही नाशिककरांंना देशातील विविध शहरांना आणि जगाला जोडणारी असून, येथील प्रतिसाद आणि अन्य मार्गांवरील सेवा सुरू करणे किंवा मुंबईच्या विमानतळाला पर्यायी म्हणून नाशिकच्या विमानतळाचा पार्किंगसाठी वापर, मालवाहतूक या सर्वांबाबतच सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी चेक इन काउंटरचेही उद्घाटन करण्यात आले. सदरची सेवा आठवड्यातून तीन दिवस चालणार आहे. उडान योजनेअंतर्गत चाळीस तिकिटे शासन दरानुसार असणार आहेत.
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
नाशिक ते दिल्ली या विमानसेवेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून, दिल्लीहून १२६ प्रवासी नाशिकला आले, तर नाशिकमधून १२५ प्रवासी दिल्लीसाठी रवाना झाले. विमानसेवेचा शुक्रवारी पहिलाच दिवस असल्याने चेक इन काउंटरवर गुलाबपुष्प देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. प्रशांत चौरसीया हे या विमानाचे पहिले प्रवासी ठरले.
नाशिक मधून ४ टन शेतमाल विदेशात निर्यात
या विमानसेवेच्या माध्यमातून नाशिक मधील चार टन शेतमाल विदेशात पाठविण्यात आला आहे. यात तीन टन आंबे तर १ टन भाजीपाल्याचा समावेश आहे. लंडन येथे आंबे तर दुबई येथे भाजीपाला पाठविण्यात आला.