आता चर्चा महापौरपदाच्या उमेदवारीची..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:42 AM2019-11-14T00:42:33+5:302019-11-14T00:42:58+5:30
महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटासाठी निघाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधकांकडून मोर्चे बांधणीस प्रारंभ झाला आहे. यासाठी निष्ठावान की बाहेरून आलेल्यास प्राधान्य, अशी चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये असतानाच संभाव्य महाशिव आघाडीही आपल्या परीने कामास लागली आहे.
नाशिक : महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटासाठी निघाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधकांकडून मोर्चे बांधणीस प्रारंभ झाला आहे. यासाठी निष्ठावान की बाहेरून आलेल्यास प्राधान्य, अशी चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये असतानाच संभाव्य महाशिव आघाडीही आपल्या परीने कामास लागली आहे.
महापौरपदासाठी भाजपकडून अनेक जण इच्छुक आहेत. त्यातील काहीजण पक्षातील ज्येष्ठत्व कर काहीजण सर्व गणिते जुळवण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम असल्याचा दावा करतात. सध्या माजी सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे आणि सतीश कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत. यातील उद्धव निमसे यांच्याकडे सध्या स्थायी समितीचे सभापतिपद असताना त्यांना भाजप संधी देण्याबाबत साशंकता आहे. माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून
निवडणूक लढविण्यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तयारी आरंभली होती. मात्र, पक्षाने त्यांना थांबण्यास सांगितल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि सीमा हिरे यांच्या प्रचारात झोकून देऊन काम केले होते. त्यावेळी त्यांना पक्षाने महापौरपद कबूल केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांचीदेखील तयारी आहे. तर पक्षातील निष्ठावान आणि ज्येष्ठत्वाच्या निकषावर सतीश कुलकर्णी यांचे नाव चर्चेत आहे. पक्षात अन्य काही पक्षांतून आलेल्या आयारामांचा विधानसभा निवडणुकीत लाभ होऊ न शकल्यामुळे निर्माण झालेली नाराजी बघता मूळ पक्षातील उमेदवार द्यायचे ठरल्यास कुलकर्णी यांचे नाव पुढे येईल. याखेरीज पक्षाकडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात रांग लागणे शक्य असून, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गणिते जुळवू पहात आहे.
राज्यातील सत्तासमीकरणांप्रमाणे नाशिक महापालिकेत महाशिव आघाडीचे गणित जुळल्यास शिवसेनेकडेदेखील अनेक जण इच्छुक आहेत. त्यात माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी असलेले त्यांचे सख्य पाहता त्यांच्या नावाविषयी चर्चा आहेच, परंतु नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही त्याचवेळी त्यांना राऊत यांनी महापौरपदाचा शब्द दिल्याची चर्चा आहे.