आता ध्वज उतरवण्यावरूनही वाद
By admin | Published: September 19, 2015 10:51 PM2015-09-19T22:51:57+5:302015-09-19T22:52:44+5:30
पेच : ‘दिगंबर’ने उतरवला; अन्य दोन आखाड्यांची वेगळी भूमिका
नाशिक : संपूर्ण कुंभमेळा वादविवादांनी गाजल्यानंतर आता तो संपल्यावरही वादविवाद पाठ सोडायला तयार नाही. कुंभमेळ्यासाठी तिन्ही अनी आखाड्यांनी उभारलेले ध्वज उतरवण्यावरून आता नवा वाद उभा राहिला आहे. दिगंबर आखाड्याने शनिवारी सकाळीच आपला ध्वज उतरवला, तर उर्वरित दोन्ही आखाड्यांनी मात्र आपापले ध्वज कायमस्वरूपी ठेवण्याची भूमिका घेतल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
कुंभमेळ्याचे शाहीस्नान जवळ आल्याची द्वाही साधू व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधूंच्या आखाड्यांमार्फत ध्वजारोहण केले जाते. त्यानुसार गेल्या १९ आॅगस्ट रोजी साधुग्राममध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला.
दिगंबर, निर्वाणी व निर्मोही आखाड्यांत विधिवत पूजनानंतर प्रमुख महंतांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आले. दिगंबर आखाड्याचा ध्वज पंचरंगी, निर्वाणी आखाड्याचा ध्वज लाल, तर निर्मोही आखाड्याचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असून, सर्व ध्वजांवर उडत्या हनुमानाची सारखीच छबी साकारण्यात आली आहे. सदर ध्वज कुंभमेळ्याची तिन्ही शाहीस्नाने झाल्यानंतर म्हणजे साधारणत: महिनाभराने उतरवले जातील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानुसार दिगंबर आखाड्याने शुक्रवारी पर्वणी झाल्यानंतर आज सकाळी ६ वाजता आपल्या पंचरंगी ध्वजाची विधिवत पूजा करून पंचांच्या उपस्थितीत ध्वज उतरवला.
दुसरीकडे निर्वाणी व निर्मोही आखाड्याने मात्र सध्या ध्वज उतरवला जाणार नसल्याचे सांगितले. नाशिक महापालिकेने सदर जागा कायमस्वरूपी आखाड्यांसाठी आरक्षित केली असल्याने ध्वज व चरणपादुका स्थायी स्वरूपात ठेवणार असल्याचे या आखाड्यातील काही महंतांनी सांगितले. तर काहींनी मात्र वर्षभरानंतर ध्वज काढणार असल्याची माहिती दिली. दिगंबर आखाड्याला प्रथा-परंपरा माहीत नसून, त्यांनी विना पूजाअर्चा ध्वज उतरवल्याची टीकाही काहींनी केली. दुसरीकडे आम्ही आमच्या परंपरेनुसार ध्वज उतरवला, कोण काय म्हणते याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, असे दिगंबर आखाड्यातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)