पोस्टमन देणार ग्राहकांना आता घरपोच बँकिंग सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:51 PM2018-08-31T22:51:24+5:302018-09-01T00:18:26+5:30
नाशिक : शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह दिंडीरी येथील उप टपाल कार्यालय व त्याच्या अखत्यारीतील आणखी तीन अशा विभागातील एकूण पाच केंद्रांवर शनिवारी (दि.१) इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या कामकाजाचा शुभारंभ होत आहे. नाशिक विभागात सध्या ३२ पोस्ट आॅफिस असून, सुमारे ३३२ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही पोस्टाची बँक गावागावांमध्ये ग्राहकांच्या दारात पोहोचणार असून, ग्राहकांना घरपोच बँकिंगची सेवा मिळणार आहे. देशभरातील तब्बल १ लाख ५५ हजार कार्यालये आणि भारतीयांचा विश्वास असणाºया टपाल खात्यावर अधिकाधिक नागरिकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने प्रत्येकापर्यंत बँकिंग पोहचविण्याच्या मोहिमेला खºया अर्थाने बळ मिळणार आहे.
भारत सरकारने बँकांचे राष्ट्रीयीकरण केले त्याला गेल्या १९ जुलै रोजी ४९ वर्षे पूर्ण झाली. शेती क्षेत्राला पुरेसा पतपुरवठा करता यावा, देशात बँकिंगचा वेगाने प्रसार व्हावा, शहरांसोबत ग्रामीण भागाला बँकिंगचे लाभ मिळावेत आणि त्यावेळी ७० टक्क्यांपेक्षाही अधिक नागरिक बँकिंगच्या बाहेर होते, त्यांना बँकिंगमध्ये आणता यावे, असा या ऐतिहासिक निर्णयाचा उद्देश होता. गेल्या ४९ वर्षांत देशातील अर्थव्यवस्थने बँकिंगचा एक मोठा पल्ला गाठला असला तरी हे उद्देश अद्याप पूर्णपणे साध्य झालेले नाही. राष्ट्रीयीकरणातून बँकिंगचा विस्तार झाला आणि त्या उद्देशाच्या दृष्टीने कामही झाले, मात्र प्रत्येक भारतीय नागरिकाला बँकिंगमध्ये लाभ अद्यापही मिळू शकलेला नाही. त्यामुळेच २०१४ मध्ये जनधन बँक खात्याची योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत विक्रमी साडेबत्तीस कोटी नागरिकांनी बँकेत जनधन खाते काढले असले तरीही काही नागरिकांना हा लाभ अजूनही मिळालेला नाही, तर ज्यांनी खाती काढली त्यांना बँक गावा बाहेर असल्याने तसेच बँकचे व्यवहार करण्यास भीती वाटल्याने यासारख्या वेगवेगळ्या कारणांनी बँकिंग करता येत नाही. सबसिडीचे वाटप जनधन खात्यातून करण्याचा आणि गरजू नागरिकांना सर्व मदत याच खात्यांतून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण त्यानंतरही सबसिडी आणि इतर मदत खात्यात जमा करून घेण्यापलीकडे या खात्यांचा वापर होत नाही, असेही लक्षात आले. या प्रश्नाचे एक चांगले उत्तर सरकारला सापडले असून, इंडिया पोस्ट पेमेंट््स बँकेची शनिवारी होणारी सुरुवात हा त्याचाच एक भाग आहे.
या सेवा देणार पोस्ट बँक
एका लाखापर्यंतच्या ठेवी स्वीकारणे, मोबाइल पेमेंटस, रिटन्स सेवा, डेबिट कार्ड, नेट बँकिंग अशा सर्व सेवा ती देईल. परंतु, या बँकेतून क्रेडीट कार्ड मिळणार नाही. असंघटित कामगार आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना बँकिंग सुविधा मिळावी, हाच या बँकेचा उद्देश असल्याने त्यानुसार सेवा पुरविण्याची योजना या बँकने केली आहे. बँक सेवा शुल्क आकारून नागरिकांना घरपोच सेवा देणार आहे. मात्र ग्राहकांची क्षमता किती आहे, हे मात्र तपासून त्यात सरकारला फेरफार करावे लागणार आहेत. उदा. रोख काढणे, रोख जमा करणे यासाठी १५ रुपये (घरपोच सेवा) तर काही केंद्रांवर जाऊन या सेवा घेण्यासाठी २५ रुपये द्यावे लागणार आहेत. पण इंटरनेट व्यवहार करणाºयास कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नाही. क्यूआर कोडमार्फ त आपल्या खात्यात व्यवहार करण्याची सोयही बँक देणार आहे. त्यामुळे बँक खाते लक्षात ठेवण्याचीही गरज पडणार नाही.
१०० टक्के बँकिंगकडे वाटचाल
भारतातील निरक्षर नागरिक, वयस्कर नागरिक आणि बँकेची भाषा न समजणारे सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. टपाल किंवा पोस्ट खात्याशी सर्वसामान्य नागरिकांचे असलेले परंपरागत नाते आणि पोस्ट खात्याचा देशभर असलेला प्रचंड विस्तार, यामुळे हा बदल आपल्या देशाला १०० टक्के बँकिंगकडे घेऊन जाणार आहे.
४सरकारची १०० टक्के मालकी असलेल्या पोस्ट खात्याने ही जबाबदारी घेतली असल्याने बँकेसाठी जागा, कर्मचारी आणि विस्तार याबाबी सोप्या झाल्या आहेत. पोस्टाकडे असलेली अतिरिक्त जागा, इमारती आणि साधने नव्या बँकेसाठी वापरली जातील. नाशिक विभागात शहरातील मुख्यालयाअंतर्गत ३२ टपाल कार्यालयांमध्ये पोस्टमन, क्लार्क एमटीएस व अधिकारी मिळून जवळपास ३३२ कर्मचाºयांचे मनुष्यबळ पोस्टाकडे आहे. सध्या पोस्टाचे बचत खाते, अल्पबचत, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक, समयबद्ध एक, दोन-तीन वर्षांसाठी व पाच वर्षांसाठीची योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) व सुकन्यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून चार लाख ७५ हजार ग्राहक आहेत. आता पोस्ट पेमेंट बँके च्या माध्यमातून विभागातील घराघरापर्यंत पोहचण्याचे लक्ष असल्याची माहिती वरिष्ठ पोस्टमास्टर एम. एस. अहिरराव यांनी दिली आहे.