आता नाशिकमध्ये नाटक बंद! : प्रशांत दामले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:14 AM2018-09-04T01:14:29+5:302018-09-04T01:14:51+5:30
: कालिदास कलामंदिराची दरवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा नाशिकमध्ये नाटक बंद हाच एकमेव उपाय असल्याचे मत नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
नाशिक : कालिदास कलामंदिराची दरवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा नाशिकमध्ये नाटक बंद हाच एकमेव उपाय असल्याचे मत नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. नाट्यगृह खरे तर कमाईचे साधन नसते ती शहराची गरज असते. परंतु आता त्याला पर्याय काय, असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला. शहराचा सांस्कृतिक आणि विशेषत: नाट्य चळवळीला पूरक असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे भाडे पाचपट वाढविण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही उद्विग्न भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. कालिदास कलामंदिराची दुरवस्था झाल्यानंतर नाटके सादर करणाऱ्या आणि कलावंतांना होणाºया त्रासाबद्दल प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर व्यथा मांडली होती. त्यामुळे महापालिका खडबडून जागी झाली होती. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पात महाकवी कालिदास कलामंदिराचा विषय समाविष्ट करून त्याचे रूपडे पालटले. परंतु आता महापालिकेने त्याचे दर वाढविले आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मत व्यक्त करताना नाराजी व्यक्त केली.
नाट्यगृहे ही शहराची गरज असते. कालिदास कलामंदिराचे स्वरूप महापालिकेने पालटले असून त्याविषयी आनंद आहे. त्यासाठी प्रयत्न करणाºया आयुक्तांचे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. परंतु आता कालिदास कलामंदिराची भाडेवाढ करताना त्याकडे कमाईचे साधन म्हणून बघितले जात असेल तर त्यावर काय बोलणार, असा प्रश्न दामले यांनी केला. मुंबई- पुण्यातदेखील नाट्यगृहे आहेत. त्यांचे दरदेखील एकवीस हजार नाही. पुण्यातील नाट्यगृहाचे भाडे बारा हजार रुपये आहे. त्या नाट्यगृहाची अवस्था चांगली नाही ते जुने झाले असे म्हटले तर कालिदासदेखील कधी ना कधी जुनेच होणार आहे. मग त्याचे भाडे कमी करणार काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये कालिदास कलामंदिराला दुसरा पर्याय नाही आणि एकमेव पर्यायाचे भाडे वाढले असेल तर आता नाशकात नाटके करणे बंद करावे लागेल, असेही ते म्हणाले.