अकरावीसाठी आता ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम संधी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:53+5:302021-01-13T04:33:53+5:30
नाशिक : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, दुसऱ्या विशेष फेरीत निवड झालेल्या १ हजार ८७५ पैकी ...
नाशिक : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, दुसऱ्या विशेष फेरीत निवड झालेल्या १ हजार ८७५ पैकी १ हजार २३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर आता ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम संधी’या नियमानुसार विशेष फेरी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने संकेतस्थळावर संक्षिप्त सूचना दिली असून यासंदर्भातील सविस्तर निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत एकूण १७ हजार ९६६ विद्यार्थी अकरावीत दाखल झाले आहेत. तर अजूनही ७ हजार ३०७ जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या व दोन विशेष फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यात आतापर्यंत १७ हजार ९६६ हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. रिक्त असलेल्या ६ हजार ३०७ जागांसाठी शिक्षण विभागातर्फे ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ नियमानुसार तिसरी विशेष फेरी राबविली जाणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या विशेष फेरीसाठी ५ जानेवारी रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर १ हजार ८७५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. ८) पर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत होती. मात्र, यात एक दिवसाची मुदतवाढ मिळाल्यानंतर शनिवारी (दि.९) दुसरी विशेष फेरी पूर्ण झाली असून अजूनही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली नाही, त्यांना तिसऱ्या विशेष फेरीची प्रतीक्षा आहे.