आता परतीच्या पावसाकडे डोळे
By admin | Published: September 11, 2015 10:36 PM2015-09-11T22:36:36+5:302015-09-11T22:37:29+5:30
द्याने परिसरातील शेतकऱ्यांचे देवदेवतांना साकडे
द्याने : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके वाळत असून, शेतकरी आता परतीच्या पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. पाऊस पडावा यासाठी देवदेवतांना साकडे घालण्यात येत असून, येथील महिला व पुरुष भाविकांनी महादेव मंदिरातील शिवलिंग पाण्याखाली बुडविला आहे.
अंबासन येथील महादेव मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडावा यासाठी लोकांकडून मनोभावे पूजाअर्चा सुरू आहे. लोकपरंपरेने चालत आलेले पाऊसदेवाच्या आळवणीचे अनेक प्रकार सुरू आहेत. पाऊस पडला नाही म्हणून अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे. मेघराज भामरे, संदीप कोर, नाना पाटील, विलास कोर, तात्या कोर, उमेश कोर, प्रशांत भामरे, हेमंत कोर, बंडू अहिरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)