आता गज्वी, डॉ. मनोहर यांच्या नावाचा विचार होण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:18 AM2021-01-19T04:18:10+5:302021-01-19T04:18:10+5:30
नाशिक : येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड व्हावी, अशी मागणी ...
नाशिक : येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन नाशिकच्या प्रज्ञा पर्व या संस्थेच्या वतीने संयोजन समितीला देण्यात आले आहे. तसेच प्रख्यात कवी, समीक्षक आणि कादंबरीकर डॉ. यशवंत मनोहर यांना नाशिकचे संमेलनाध्यक्ष करावे, अशी मागणी साहित्य रसिकांकडून करण्यात आली आहे.
गज्वी हे मराठीतील दिग्गज नाटककार असून, त्यांनी चौदा नाटके लिहिली आहेत. किरवंत, गांधी-आंबेडकर,अशी सरस नाटके लिहिणाऱ्या गज्वी यांनी एकांकिका, कविता, कथा आदी साहित्य प्रकारात लेखन केले आहे. तसेच गज्वी यांच्या जागर, हवे पंख नवे या कादंबऱ्यादेखील प्रकाशित आहेत. त्यामुळे गज्वी यांना नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान मिळावे यासाठी प्रज्ञा पर्व संस्थेने लोकहितवादी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर अध्यक्ष वसंतराव रोहम, कार्याध्यक्ष नंदकिशोर साळवे, विजय होर्शिळ, एम.एल. नकोशे यांच्या सह्या आहेत, तर गत पाच दशकांहून अधिक काळ सातत्याने लिखाण करणारे कवी, समीक्षक आणि कादंबरीकार डॉ. यशवंत मनोहर यांच्या नावाचीदेखील मागणी रसिकांकडून होऊ लागली आहे. ते दलित साहित्याला आंबेडकरवादाची सैद्धांतिक भूमिका देणारे एक महत्त्वाचे विचारवंतदेखील म्हणून ओळखले जातात. शंभरहून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. उत्थानगुंफापासून ते अग्निशाळेचे वेळापत्रकपर्यंतचा त्यांचा वाङ्मयीन प्रवास थक्क करणारा आहे. कवितेशिवाय अन्य लेखनातून आणि संपादनातून त्यांनी भारतीय समाजजीवनातील जातिव्यवस्था, संस्कृती, वेद, शास्र, पुराण आणि समकालीन स्थितीगतीसारख्या असंख्य विषयांवर रोखठोक भाष्य केले आहे.
इन्फो
गज्वींचे नाव दोन वर्षांपासून
महामंडळाच्या अधिकारानुसार मावळत्या अध्यक्षांना पुढील अध्यक्ष पदासाठी एकमेव नाव सुचविण्याची मुभा आहे. त्यानुसार लक्ष्मीकांत देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी अध्यक्ष पदावरून पायउतार होत असताना नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे नाव सुचविले होते. मात्र महामंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी अरुणा ढेरे यांच्या नावाला पसंती दिली होती. त्यामुळे प्रेमानंद गज्वी यांचे नाव अध्यक्ष पदासाठी दोन वर्षांपासून चर्चेत आहे.
इन्फो
मनोहरांचे नाव अचानक चर्चेत
विदर्भ साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘जीवनव्रती’ पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना देण्यात येणार होता. त्यांनी प्रारंभी तो स्वीकारत असल्याचे सांगून नंतर सभागृहात सरस्वती देवतेची मूर्ती ठेवली जाणार असल्याने आपल्या जीवनदृष्टीनुसार हा पुरस्कार स्वीकारता येणार नसल्याचे गत आठवड्यातच कळवले. त्यामुळे गत दोन दिवसांपासूनच त्यांच्या नावाच्या चर्चेलादेखील प्रारंभ झाला आहे.
लोगो
साहित्य संमेलनाचा लाेगो वापरावा.