आता वाहनतळ जागेचा तिढा
By admin | Published: January 12, 2015 12:53 AM2015-01-12T00:53:22+5:302015-01-12T00:53:41+5:30
सिंहस्थ कुंभमेळा : भाडेदरावरून वाद; मालकांना हवे साधुग्राम अधिग्रहित जागेचेच मोल
नाशिक : तपोवनात साधुग्रामसाठी अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या भाड्याच्या दराइतकेच दर वाहनतळासाठी अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी देण्यात यावे, अशी जागामालकांनी मागणी करण्यास सुरुवात केल्याने वाहनतळाच्या जागेचा वाद नव्याने उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना शाही पर्वणीच्या काळात तीन दिवस शहरात गर्दीमुळे प्रवेश नाकारण्यात येणार असल्यामुळे अशा वाहनांना शहराबाहेरच उभे करण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर अकरा वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत म्हणजेच तहसीलदारांमार्फत वाहनतळासाठी तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने जागा अधिग्रहीत करण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली तरी, वाहनतळासाठी जागा अधिग्रहीत करून त्याचे सपाटीकरण, मजबुतीकरण, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह, निवाराशेड अशा विविध प्रकारच्या सोयी या ठिकाणी करण्यात येणार असल्याने साधारणत: मार्च महिन्यांपर्यंत वाहनतळासाठी जागा अधिग्रहीत करून ती महापालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात देण्याचे नियोजन आहे. परंतु ज्याप्रमाणे तपोवनातील जागेचा तिढा वाढत गेला त्याचप्रमाणे वाहनतळासाठी जागा अधिग्रहण करणेही जिकरीचे वाटू लागले असून, तपोवनातील शेतकऱ्यांना प्रशासनाने १० लाख ५६ हजार रुपये भाडे देऊ केले, परंतु वाहनतळासाठीच्या जागेचे दर अद्याप निश्चित केलेले नाहीत. दोन्ही दर एकाच वेळी निश्चित करून जाहीर केले असते तर कदाचित वाद निर्माण झाला असता. ते टाळण्यासाठी प्रशासनाने खेळी करीत तपोवनातील दर निश्चित केले व येथील जागा अधिग्रहीत झाल्यानंतरच वाहनतळासाठी जागा अधिग्रहीत करण्याचे ठरविण्यात आले आहे; परंतु ज्याप्रमाणे तपोवनातील जागेला मोबदला दिला जाईल त्याचप्रमाणे वाहनतळाच्या जागेलाही मिळावा, अशी मागणी सुरू झाली आहे.
शहराला मिळणाऱ्या पुणे, मुंबई, पेठ, औरंगाबाद, दिंडोरी, मालेगाव, त्र्यंबकेश्वर या रस्त्यावर सुमारे अकरा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी रस्त्यालगतच जागा मुक्रर करण्यात आल्या असून, त्यातील बहुतांशी जागा शेतजमिनी आहेत. या जागांचे सपाटीकरण व त्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या जमिनींवर होणारे तात्पुरते बांधकाम व त्यातून होणारे नुकसानीशी निगडीतच मोबदला मिळावा, अशी मागणी जागामालकांकडून केली जात आहे.
(प्रतिनिधी)