काँग्रेस, राष्टवादीपेक्षा आत्ताचे सरकार बेकार : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:18 AM2018-12-23T01:18:45+5:302018-12-23T01:19:13+5:30
लोकांच्या संगणक, फोन व मोबाइलवर पाळत ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारला खड्ड्यात घालणारा आहे. पाच राज्यांतील निवडणुकीतील निकालानंतर आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे सरकार चुका करतील, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक : लोकांच्या संगणक, फोन व मोबाइलवर पाळत ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारला खड्ड्यात घालणारा आहे. पाच राज्यांतील निवडणुकीतील निकालानंतर आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे सरकार चुका करतील, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. कॉँग्रेस आणि राष्टवादीपेक्षा हे सरकार बेकार आहे, असे खास ठाकरी शैलीत सांगताना त्यांनी नरेंद्र मोदी सरकारचेही वाभाडे काढले. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी दौºयाच्या समारोपाच्या वेळी शनिवारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली.
ते म्हणाले पाच राज्यांतील निवडणुकीतील निकाल हे तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लोकांचा राग आहे. आता निवडणुका जवळ येतील तसे हे सरकार चुका करत जाईल. इंटरनेट आणि मोबाइल म्हणजे फटीतून घरात शिरण्याचा प्रकार आहे. अशाप्रकारे तपासणी केलीच तर मोदी सरकारला लोकांनी शिव्या दिल्याचेच सापडेल, असेही ते म्हणाले. महागाई वाढली, लोकांच्या हातातून पैसा काढून घेतला. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि आता अशा चुका सरकार करीत आहेत. नोटाबंदीचा निर्णय घेणाºया नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन स्वत:साठी खड्डा खोदल्याची माझी पहिली प्रतिक्रिया होती. मोदींएवढे या देशाला कोणीही खड्ड्यात कोणीही टाकले नाही. इतके वाईट निर्णय मायावतीदेखील घेणार नाहीत, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाला पर्याय कोण आहे, असा प्रश्न केल्यानंतर राज यांनी या देशात निवडणुका विरोधी पक्ष जिंकत नसतात तर सरकार हरत असते. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी पंडित नेहरू यांना पंतप्रधान केले, परंतु त्यानंतरचे अगदी देवेगौडांपर्यंतचे उमेदवार कोणी ठरवले होते, असा प्रश्न करून ते म्हणाले की, सरकारच्या कामगिरीमुळे ते पराभूत होत असते. मनमोहनसिंग यांच्या विरोधातील रोषामुळे त्यांचे सरकार पराभूत झाले त्याचा फायदा नरेंद्र मोदी यांना झाला. मोदी यांच्या ऐवजी अडवाणी किंवा वाजपेयी असते तर त्यांना त्याचा फायदा झाला असता, असेही ते म्हणाले.
कांदा उत्पादक शेतकºयांना दोनशे रुपयांचे अनुदान अपुरे आहे, असे सांगताना हे सर्वच प्रश्नांवर फेल झालेले सरकार आहे. राज्यात १ लाख २० हजार विहिरी बांधण्यात आल्याचे सरकार सांगत होते, मग आज दुष्काळ का पडला आहे. जलसंधारणाची कामे कुठे गेली असे सांगून हे कॉँग्रेस आणि राष्टÑवादीपेक्षा बेक्कार सरकार असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात वाद करून बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत राहतात, परंतु त्याचा आता उपयोग नाही असे सांगत त्यांनी पाच राज्यांतील सरकारपेक्षा महाराष्टÑात बत्तर हाल होतील, असे ते म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले,
* निवडणुका आल्या की भाजपाला राम मंदिर आठवेल आणि त्याविषयावरून दंगली होतील, असे मी फेब्रुवारीत सांगितले होते.
* मनसेच्या कार्यक्रमांचे गर्दीचे मतांत रूपांतर नक्की होते. २०१४ च्या निवडणुकांच्या आधी डोकावून बघा, २००९ मध्ये काय घडले होते.
* कॉँग्रेस आघाडीबरोबर जायचे की नाही ते ठरले नाही. निवडणुका येतील तेव्हा सांगतो. शरद पवार यांच्याबरोबर विमानातून आलो आणि चर्चा सुरू झाल्या, आघाडीच्या चर्चा काय अशा विमानात बसून होतात का?
* नितीन गडकरी पंतप्रधान पद देण्याची चर्चा त्यांचे शत्रूच करत असतील.
* नसरुद्दीन शहा काय म्हणाले यापेक्षा देशातील वातावरण मात्र घाण झालंय, एवढे नक्की.
* लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होतील, असे वाटत नाही. सरकार एकाचवेळी फावडे आणि कुºहाड पायावर मारून घेणार नाहीत. आधी फावडे मारून घेतील मग कु-हाड.
मूळप्रश्न भरकटविण्यासाठीच...
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राम आठवला आणि आता हनुमानाच्या जातीचा वाद सुरू आहे, या विषयावर राज यांनी आज सकाळीच कोणीतरी हनुमान चिनी होता, असं म्हटल्याचं ऐकलं. हनुमान उडत असल्याने तो अनेक देशांवरून उडत गेला असेल असे सांगत हे काय राजकारण्यांचे विषय झाले का? असा प्रश्न केला आणि देशातील मूळप्रश्न भरकटविण्यासाठीच अशा चर्चा सुरू केल्या जातात.