आता द्राक्षांची दैना !
By किरण अग्रवाल | Published: December 23, 2018 01:22 AM2018-12-23T01:22:10+5:302018-12-23T01:26:39+5:30
कांद्याचा वांधा पूर्णत: अथवा समाधानकारकरीत्या संपला नसताना आता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ आली असून, द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाल्याने नवीनच संकट उभे ठाकले आहे.
कांद्याचा वांधा पूर्णत: अथवा समाधानकारकरीत्या संपला नसताना आता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ आली असून, द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाल्याने नवीनच संकट उभे ठाकले आहे.
निसर्ग कधी कधी अशी काही परीक्षा घेतो की, मनुष्याला कोलमडून पडण्याखेरीज गत्यंतर उतर नाही. यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवली, त्यामुळे अगोदरच बळीराजा संकटग्रस्त ठरला आहे. त्यात कांदा गडगडला. त्यासंदर्भात आंदोलने घडून आल्याने राज्य शासनाकडून अल्पसे का होईना दोनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान घोषित केले गेले. ते पुरेसे नाहीच; पण बुडत्याला काडीचा आधार म्हणून त्याकडे पाहता यावे. या ससेहोलपटीतून कांदा उत्पादक उसासा घेत नाही तोच द्राक्षे उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली असून, निफाड तालुक्यात तर पारा ६.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. याच तालुक्यात द्राक्ष उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. रब्बीच्या गहू, हरभरा, कांदा पिकासाठी ही थंडी लाभदायी ठरणारी असली तरी द्राक्षांसाठी मात्र धोकादायक आहे. कारण, त्यामुळे द्राक्षमणींची फुगवण होऊन साखरेचा उतारा कमी होईल. अशाने मणी तडकण्याचाही धोका आहे. शिवाय, थंडीमुळे भुरी रोगाचा प्रादुर्भावही घडून येत असतो. याच्या परिणामी द्राक्ष उत्पादनात घट होईल, तसेच प्रतही घसरेल जी निर्यातीकरिता अडचणीची ठरेल. निर्यातीकरिताच्या द्राक्ष उत्पादनासाठी यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील २७ हजारांहून अधिक प्लॉट्सची नोंदणी कृषी खात्याकडे झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ती गेल्यावर्षी झाली होती तेवढी म्हणजे ३० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. द्राक्ष निर्यातीकडे वाढलेला कल व त्यातून फिरणारे अर्थकारण याची प्रचिती यातून यावी. परंतु थंडीतली वाढ कायम राहिल्यास द्राक्षांना फटका बसून उत्पादन व निर्यात अशा पुढील साऱ्या प्रक्रियेवर परिणाम घडून येईल. निसर्ग व नशिबाचा हा फेरा खरेच शेतकरीवर्गाच्या सहनशीलतेचा अंत पाहणाराच आहे. निसर्गाचे बिघडलेले ताळतंत्र पाहता शाश्वत शेती हाच यावरील उपाय ठरावा; परंतु त्याकडे वळण्यापूर्वी असे वा इतके फटके सोसणे अवघड ठरले आहे.