आता बाधित आकड्यांची लपवाछपवी; दाखविले १३८ पण वाढ ४,०५४ रुग्णांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:53+5:302021-07-18T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि.१७) एकूण १३८ रुग्ण नवीन बाधित आढळून आल्याचे सांगण्यात आले असले, तरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि.१७) एकूण १३८ रुग्ण नवीन बाधित आढळून आल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात तब्बल ४,०५४ रुग्णांची वाढ आढळून येत आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंतच्या बाधितांची नोंद ३ लाख ९७ हजार ३० इतकी देण्यात आली होती. त्यात शनिवारी केवळ १३८ रुग्णांचीच भर पडली असल्याचे सांगताना, प्रत्यक्षात आतापर्यंतच्या एकूण बाधितांच्या संख्येचा आकडा ४ लाख १ हजार ८४ अशी दर्शविण्याची मखलाशी करण्यात आली आहे. म्हणजेच जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीत मृतांच्या लपवाछपवीनंतर आता बाधितांची लपवाछपवी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या बळींच्या नोंदी पोर्टलवर करण्याचे काम राहून गेल्याच्या नावाखाली गत महिन्याभरात तब्बल ३,४१७ बळींची भर घालण्यात आली. त्यामुळेच मागील महिन्यात ५ हजारांच्या आसपास असलेली बळींची संख्या या महिन्यात साडेआठ हजारांनजीक पोहोचली आहे. त्या प्रकरणात आकडेमोडीतील गोंधळ पार पडल्यानंतर, आता यंत्रणेकडून बाधित आकड्यांच्या संख्येत केलेली लपवाछपवी उघडकीस आली आहे. यंत्रणेकडून जिल्ह्यात शनिवारी (दि.१७) एकूण अवघे १३८ नवीन कोरोनाबाधित तर १३४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे आकडेवारीतून दाखविण्यात आले आहे, तर दिवसभरात ८ जणांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ८,४६६ वर पोहोचली आहे.
इन्फो
आकड्यांमध्ये प्रचंड तफावत
शुक्रवार आणि शनिवारच्या बाधितांच्या अंकांमध्ये प्रचंड तफावत दिसून येत आहे. आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या शुक्रवारी ३ लाख ९७ हजार ३० इतकी असताना, त्यात शनिवारी केवळ १३८ रुग्णांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात शनिवारी प्राप्त झालेल्या शासकीय आकडेवारीतच बाधितांचा आकडा ४ लाख १ हजार ८४ झाली असून, हा फरक तब्बल ४,०५४ इतका आहे. त्याप्रमाणेच आतापर्यंतच्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या शुक्रवारी ३ लाख ८७ हजार २४ दर्शविण्यात आली असताना, त्यात शनिवारी केवळ १३४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे दाखविल्यानंतर, शनिवारी कोरोनामुक्तांची संख्याही तब्बल ३ लाख ९१ हजार ७४ वर पोहोचली आहे.
इन्फो
खुलासा न करताच परस्पर वाढ
एकूण बाधितांच्या आकड्यात एवढी प्रचंड वाढ करीत असताना, त्याबाबतचा कोणताही खुलासा आरोग्य विभागाच्या वतीने किंवा जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आला नव्हता. बळींप्रमाणे ‘पोर्टलवर अपलोड करण्याचे राहून गेले’ असा गोंडस खुलासा करण्याची तसदीही न घेता, संबंधित यंत्रणेने ती परस्पर वाढ करून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
कोट
जिल्ह्याबाहेर उपचार झालेल्यांची नोंद
बाधित आणि कोरोनामुक्तांची प्रत्यक्ष नोंद आणि पोर्टलवरील नोंद जुळत नव्हती. नाशिक जिल्ह्याचे आधार कार्ड असलेल्यांनी जिल्ह्याबाहेर उपचार घेतलेल्याने ती नोंद जुळत नव्हती. शनिवारी संध्याकाळी ती जुळवून घेण्यात आली असल्याने बाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे.
डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक