आॅनलाइन भरणा करणाऱ्यांना आता घरपट्टीची देयके
By Admin | Published: June 1, 2015 01:21 AM2015-06-01T01:21:04+5:302015-06-01T01:21:24+5:30
आॅनलाइन भरणा करणाऱ्यांना आता घरपट्टीची देयके
नाशिक : महापालिकेने दिलेल्या सवलतीचा लाभ घेत हजारो नागरिकांनी घरपट्टी आॅनलाइन भरली आणि सूटही मिळवली. तथापि, पालिकेने अशाप्रकारे आॅनलाइन भरणा करणाऱ्यांना आता घरपट्टीची देयके पाठविली आहेत. त्यामुळे महापालिकेचा आॅनलाइन कारभार आॅफलाइन झाला की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.महापालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. तथापि, त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी देयके दिली जातात. वार्षिक देयकातील निम्मी रक्कम आॅक्टोबरपर्यंत, तर उर्वरित रक्कम डिसेंबरपर्यंत भरणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास दोन टक्के शास्ती (व्याज) भरावी लागते. गेल्यावर्षी शास्ती लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ओरडही झाली होती. त्यामुळे गेल्यावर्षी आयुक्तपदी संजय खंदारे असताना तयार करण्यात आलेली घरपट्टी सवलत योजना यंदा एप्रिल महिन्यापासून राबविण्यास प्रारंभ झाला. त्यानुसार महापालिकेने एप्रिल महिन्यात स्वत:हून पालिका कार्यालयात जाऊन वा आॅनलाइन घरपट्टी भरल्यास (अगोदरच्या घरपट्टीवरील इंडेक्स नंबर सांगितल्यानंतर चालू वर्षीचे देयक मिळते) त्याला सवलत देण्याची योजना जाहीर केली. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या म्हणजे एप्रिल महिन्यात घरपट्टी भरल्यास पाच टक्के सवलत आणि मे महिन्यात अशाच प्रकारे पालिकेच्या देयकाची वाट न बघता रक्कम भरल्यास तीन टक्के, तर जून महिन्यात दोन टक्के सवलत देण्याची योजना पालिकेने जाहीर केली. त्याला मिळकतधारकांचा प्रतिसाद मिळाला आणि एप्रिल महिन्यात घरपट्टीचे देयक हाती नसतानादेखील सुमारे ३५ हजार नागरिकांनी घरपट्टी आगाऊ भरली. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एप्रिल महिन्यात दहा कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त झाली आहे. तथापि, इतका प्रतिसाद दिल्यानंतरही संबंधित नागरिकांच्या हाती घरपट्टीची देयके पडली आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आगाऊ घरपट्टी भरण्यामध्ये सातपूर विभाग हा सर्वात आघाडीवर होता. या योजनेचा सर्वाधिक फायदा उद्योजकांनी घेतला. (प्रतिनिधी)