आता कारवाई करून बंड करणार थंड
By admin | Published: February 11, 2017 12:09 AM2017-02-11T00:09:53+5:302017-02-11T00:10:06+5:30
पक्षशिस्त : भाजपाकडे सर्वाधिक बंडखोर
नाशिक : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली असून, बंडखोरांना वेगवेगळ्या पद्धतीने शांत करण्यास जोर आला आहे. आता शुक्रवारपासून बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. अन्य पक्षांच्या वतीनेदेखील आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यातही भाजपा आणि शिवसेनेकडे मिळूनच सुमारे दीड हजार इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्याने अनेक प्रभागांमध्ये बंडाचे निशाण फडकविण्यात आले आहे. त्यात भाजपाकडे बंडखोरी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाबुराव आढाव इतकेच नव्हे तर सहा महिन्यांपूर्वी नाशिकरोड येथे पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवक मंदा ढिकले यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनीही बंडाचे निशाण हाती घेतले आहे.
सातपूर विभागात माजी नगरसेवक रेखा नंदू जाधव यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनीही बंड केले आहे. याशिवाय भाजपाचे अनेक कार्यकर्ते बंडखोर आहेत. अन्य नाराजांनी आणि बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. तसेच दोन दिवसांपूर्वी भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनीही नाशिकमध्ये येऊन नाराजांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे गुरुवारी अखेरचा पर्याय म्हणून संबंधिताना डेडलाइन देण्यात आली. ती संपल्यानंतर शुक्रवारपासून पक्षातून निलंबन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले.