...आता मेनरोड बाजारपेठेतील जोडरस्तेही सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:23 AM2021-04-05T01:23:53+5:302021-04-05T01:24:16+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिसांनी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड भागाचा परिसर संपूर्णपणे नियंत्रणाखाली आणला आहे. रविवारी दिवसभरात मेन रोड बाजारपेठेकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांसह सर्व लहान गल्ली-बोळांच्या ‘चोरवाटा’देखील पोलिसांनी बल्ली बॅरिकेडिंग करून बंद केल्यामुळे मेन रोड बाजारपेठेत अवैध प्रवेशाचा ‘मार्ग’ बंद झाला आहे.
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिसांनी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड भागाचा परिसर संपूर्णपणे नियंत्रणाखाली आणला आहे. रविवारी दिवसभरात मेन रोड बाजारपेठेकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांसह सर्व लहान गल्ली-बोळांच्या ‘चोरवाटा’देखील पोलिसांनी बल्ली बॅरिकेडिंग करून बंद केल्यामुळे मेन रोड बाजारपेठेत अवैध प्रवेशाचा ‘मार्ग’ बंद झाला आहे.
मेन रोड बाजारपेठेत सोमवार ते शुक्रवारपर्यंत तोबा गर्दी उसळते. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शनिवारपासून पोलिसांनी या संपूर्ण बाजारपेठेचे बारकाईने निरीक्षण करीत मुख्य रस्त्यांसह अनावश्यक एंट्री पॉइंट बंद केले. तसेच घुसखोरी टाळण्यासाठी लहान गल्लीबोळासुद्धा लाकडी बल्ली लावून बंद केल्या आणि जेथे शक्य आहे तेथे लोखंडी मोठ्या बॅरिकेडचा वापर करण्यात आला आहे. एकूणच कुठल्याही रस्त्याने मेन रोड बाजारात नागरिक टोकन न घेता घुसखोरी करणार नाही, याची पूर्ण खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.
पोलिसांनी निश्चित केलेल्या एन्ट्री पॉइंटवरूनच नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून मिळणारे मोफत टोकन घेणे अत्यावश्यक राहणार असल्याचे आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.
....पास वाटपाचा रविवार
मेनरोड बाजारपेठेत एन्ट्री पॉईंटवरून केवळ व्यावसायिक व त्यांच्याकडे काम करणारे कामगार आणि ग्राहकांनाच प्रवेश दिला जाईल. रविवारी दिवसभर पोलिसांनी व्यावसायिकांना टप्प्याटप्प्याने बोलावून पासचे वाटप केले. पास असलेल्या कामगारांनाच प्रवेश दिला जाणार असून, विनाटोकन अथवा विनापास प्रवेश करताना आढळून आल्यास थेट ५०० रुपयांचा दंड पोलिसांकडून केला जाणार आहे.
...या भागात ‘एन्ट्री पॉइंट’
बाजारपेठेतील वावरे लेन (नेपाळी कॉर्नर), नवापुरा, भद्रकाली-बादशाही कॉर्नर, धुमाळ पॉइंट (दहीपूल), बोहरपट्टी कॉर्नर आणि रेडक्रॉस सिग्नल या ठिकाणी पोलिसांनी तंबू ठोकले आहेत. प्रत्येक ‘पॉइंट’जवळ ‘सुरक्षित सामाजिक अंतरा’चे पालन करण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली आहेत. ग्राहकांना सोमवारीमोफत कूपन घेत बाजारपेठेत प्रवेश करावा लागेल.