एमपीएससी परीक्षेसाठी आता मर्यादित संधी, बंधनांविरोधात विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:34+5:302021-01-03T04:15:34+5:30
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ...
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी)च्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील व मागास प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षेच्या संधी मर्यादीत केल्या आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गासह मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्येही तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
एमपीएससीच्या निर्णायानुसार, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एमपीसीएसीच्या परीक्षा देण्याच्या केवळ सहा संधी मिळणार आहे, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊ संधी मिळणार आहे. हा निर्णय २०२१च्या जाहिरातीपासून लागू होणार आहे. मात्र, त्यामुळे येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षेतील खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची स्पर्धाच संपुष्टात येण्याची भीती स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदविला आहे.
कोट-१
एमपीएससीसीच्या स्पर्धा परीक्षांवरील निर्बंधांमुळे खु्ल्या प्रवर्गाचे स्पर्धा परीक्षेतील आव्हाण संपुष्टात येईल. एकीकडे खुल्या प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, तर दुसरीकडे परीक्षांच्या संधीही मर्यादित करून खुल्या प्रवर्गावर अन्याय होत आहे.
रवींद्र बोराडे, उमेदवार
कोट-२
स्पर्धा परीक्षेच्या संधी कमी झाल्यामुळे खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. परीक्षेच्या संधी मर्यादितच करायच्या असतील, तर त्या सरसकट सर्वांसाठीच कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही.
विलास जाधव, उमेदवार
कोट-३
संधी कमी करण्याचा निर्णय निषेधार्ह
प्रवर्गनिहाय आरक्षणातील असतोल हा बहुतांश उमेदवारांना मान्य असला, तरी निवडक विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या संधी कमी केल्याने संबंधित प्रवर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही एका किंवा दोन प्रवर्गांच्या संधी कमी करण्याचा निर्णय निषेधार्ह आहे.
सागर ढेरिंगे, उमेदवार
कोट-४
एमपीएसीच्या संधी कमी झाल्याने खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मोठ्या नुकसान होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा दिल्यानंतर मुख्य परीक्षा देणे शक्य होत नाही. त्यामुळे पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संधी कमी होऊ नये.
अमोल गायधनी, उमेदवार
इन्फो-
अशा प्रकारे संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.