...आता साहित्याला लाभेल वैज्ञानिक आयाम ! - भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 03:13 PM2021-02-05T15:13:04+5:302021-02-05T15:16:07+5:30
नारळीकरांसारखा विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्याला वैज्ञानिक आयाम देणारे ठरेल
पुणे / नाशिक : मराठी वाचकाला अवघ्या ब्रह्मांडाचे ज्ञान डॉ. जयंत नारळीकर यांनी दिले. नारळीकरांसारखा विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्याला वैज्ञानिक आयाम देणारे ठरेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
आयुका येथे डॉ. नारळीकर यांची भेट घेऊन भुजबळ यांनी त्यांना संमेलनाचे निमंत्रण दिले. ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर, संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या लोकहितवादी संस्थेचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर या वेळी उपस्थित होते. “साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्ती असू नयेत, या मताशी मी सहमत आहे. साहित्य संमेलनात कोणाला बोलवायचे याचा निर्णय साहित्य महामंडळ घेईल. त्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाही, असे भुजबळ म्हणाले.
डॉ. नीलम गोऱ्हेंकडून १० लाखांचा निधी
९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमअंतर्गत १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्याबाबत त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.