बसथांब्यांसाठी आता शोधला दुसरा ठेकेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 10:13 PM2021-01-28T22:13:05+5:302021-01-29T00:40:01+5:30
नाशिक- महापालिकेच्या बससेवेसाठी पीपीपीअंतर्गत बसथांब्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने विविध सबबी सांगत नकार दिल्यानंतर महापालिकेने आता सेंकड लोएस्ट ठेकेदाराला काम देण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रस्तावावर शुक्रवारी (दि.२९) स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे.

नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने २६ जानेवारीपासून बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, राज्य शासनाच्या परिवहन मंत्रालयाने बस ऑपरेशनसाठी लागणारा परवानाच वेळेत दिला नाही. त्यातच शहरात ७६२ बसथांबे पीपीपीअंतर्गत बांधणाऱ्या ठेकेदारानेदेखील माघार घेतली.
शहरात बसथांबे तयार करून त्यावर येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून संबंधित ठेकेदार भांडवली गुंतवणूक आणि उत्पन्न मिळवेल. परंतु, त्याचबरोबर नाशिक महापालिकेला वर्षाकाठी ६३ लाख रुपये संबंधित ठेकेदार देणार होता. परंतु, कोरोनाकाळामुळे अडचणी आल्याचे निमित्त करून या ठेकेदाराने महापालिकेकडे मुदतवाढ मागितली. बससेवा सुरू होत असल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी ठेकेदार कंपनीची मागणी मान्य केली नाही.
फारतर टप्प्याटप्प्याने बस शेल्टर बांधण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, ठेकेदाराने नकार दिला. आता दुसऱ्या न्यूनतम देकार देणाऱ्यास काम देण्यात आले असून या ठेकेदाराने अगोदरच्या ठेकेदारापेक्षा २५ हजार अधिक म्हणजेच ६३ लाख २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविल्याने आता या ठेकेदारास काम देण्याचा प्रस्ताव प्रशासन शुक्रवारी (दि.२९) स्थायी समितीवर सादर करणार आहे.