आता शिक्षण मंडळांचे सदस्य शाळांच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:46+5:302021-01-08T04:42:46+5:30
नाशिक : कोरोनाचे संकट कमी होऊ लागल्याने आता शिक्षण पुन्हा सुरू होऊ लागले आहे. त्याचा विचार करता महापालिकेच्या ...
नाशिक : कोरोनाचे संकट कमी होऊ लागल्याने आता शिक्षण पुन्हा सुरू होऊ लागले आहे. त्याचा विचार करता महापालिकेच्या शाळांची अवस्था बघून तेथील अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य शाळांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर काही धोरणात्मक निर्णय घेणार आहेत.
शिक्षण मंडळाची बैठक नुकतीच सभापती संगीता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ५) संपन्न झाली. यावेळी याबाबत निर्णय घेण्यात आला. सर्व शिक्षण समिती सदस्यांसमेवत मनपाच्या शाळांना भेटी देऊन शाळा इमारती, सुरक्षा रक्षक व्यवस्था याबाबत आढावा घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले. कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने आता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शासनाकडून प्राथमिक शाळा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास त्या दृष्टीनेदेखील तयारी करण्याची सूचना सभापती गायकवाड यांनी केली आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची असल्याने मनपातर्फे विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. मनपाच्या ज्या शाळा इमारतींमध्ये दुरुस्तींची कामे करायची आहेत. त्याबाबत एकत्रित प्रस्ताव बांधकाम विभागास तातडीने सादर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी जगदीश पवार यांनी, पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याने पिंपळगाव खांब येथील मनपा शाळा क्रमांक ८८ मध्ये स्थानिक उपद्रवी मद्यपींकडून शाळेत अस्वच्छता केली जाते, शाळेची सुरक्षितता होत नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले. या दृष्टीने मनपा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करण्याबाबत शिक्षण सभापतींनी निर्देश केले. यावेळी झालेल्या चर्चेत उपसभापती शाहीन मिर्झा, शिक्षण समिती सदस्य जयश्री खर्जुल व जगदीश पवार तसेच प्रशासनाधिकारी सुनीता धनगर आदींनी सहभाग घेतला.