कारागृहात आता मोबाइल जामर
By admin | Published: March 3, 2017 01:33 AM2017-03-03T01:33:40+5:302017-03-03T01:33:55+5:30
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून मोबाइलचा वापर केला जात असल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून कारागृहात २५ ठिकाणी जामर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून मोबाइलचा वापर केला जात असल्याने त्याला पायबंद घालण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून कारागृहात २५ ठिकाणी जामर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे काही प्रमाणात नक्कीच मोबाइल वापरावर परिणाम होणार आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैदी मोबाइलचा वापर करत असल्याचे विविध ठिकाणच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात तर दिवसाआड कारागृहात मोबाइल बेवारस सापडण्याचा प्रकार उघडकीस आला होता. तेव्हा ५० हून अधिक मोबाइल सापडले होते. कारागृहात कैद्याकडे मोबाइल कसा पोहचतो याचे गूढ मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र कारागृहाच्या बाहेरील बाजूने अज्ञात युवक कारागृहाच्या उंच तटरक्षक भिंतीवरून अत्यंत व्यवस्थित पॅकिंग केलेला मोबाइल आतमध्ये फेकत असल्याचे बोलले जाते. मात्र आतमध्ये ज्या कैद्याकरिता मोबाइल फेकला आहे तो मोबाइल त्याच कैद्याला कसा मिळतो हेदेखील गूढ आहे. कारागृहात मोबाइल कैद्यापर्र्यंत पोहचले, मोबाइल वापरासाठी चार्जिंग करणे आदि सर्व प्रकार संशयास्पद आहे.
कारागृहात कैद्यांना मोबाइलचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाने महत्त्वाच्या २५ ठिकाणी जामर बसविण्यास गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. कैद्याचे बॅरेक, त्यांना ज्या भागात दिवसभर सोडले जाते अशा महत्त्वाच्या २५ ठिकाणी प्राधान्याने जामर बसविण्यात येत असल्याचे कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी सांगितले. यामुळे नक्कीच कारागृहात काही प्रमाणात कैद्यांना मोबाइलचा वापर करणे अवघड होऊन जाणार आहे. कारागृहात बसविण्यात येत असलेल्या ‘जामर’चा कितपत फायदा झाला हे आगामी काळात समजेलच. (प्रतिनिधी)