आता महापालिकाच लस खरेदी करून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:41+5:302021-05-17T04:13:41+5:30
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण रखडले असून त्या ...
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण रखडले असून त्या पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिकेच्यावतीने लस खरेदी करून नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली असून सोमवारी (दि.१७) त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशभरात कोविशिल्ड लसीकरण सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट वर्कर्सला लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना लसीकरण करण्यास प्रारंभ झाला. मात्र, पुरेशा प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यातच १ मेपासून शासनाने १८ ते ४५ वयोगटातील युवक आणि नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले केले आहे. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडत आहे. लसींचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्यांना पहिला डोस मिळाला आहे त्यांची दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत घोळ सुरू असून त्यामुळे आता सरकारनेच ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी ८२ दिवस अंतराची अट घातली.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येत देशपातळीवर टॉप टेन शहरांमध्ये नाशिकचा समावेश झाला. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. नागरिक लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, दुसरीकडे अपुऱ्या लसीमुळे अडचण येत आहे. त्यातच खासगी रुग्णालयातील लसीकरण पूर्णत: बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना किंवा महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर अवलंबून रहावे लागत आहे. अनेक नागरिक शहराच्या बाहेर असलेल्या ग्रामीण भागात जाऊनदेखील लस घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिक महापालिकेच्यावतीने लस खरेदी करून त्या नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन तसेच महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी त्यांनी याबाबत चर्चा केली अशाप्रकारच्या लस खरेदी करण्यासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च प्राथमिक खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येणार आहे.
आयुक्त कैलास जाधव आणि महापौर हे सोमवार (दि १७) या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत
...कोट...
नागरिकांना लस घेण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत आहे. अनेक केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून लस मिळावी यासाठी रांगेत उभे राहतात. सध्या युवकांना लस मिळत नाही आणि ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या निधीतून लस देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात येईल.