आता पुराच्या आधीच नाशिककरांना मिळणार अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:16+5:302021-09-12T04:18:16+5:30

गोदाकाठी वसलेले शहर असल्याने नाशिककरांना पूर नवीन नाही. ९ सप्टेंबर १९६९ मध्ये आलेला महापूर हा नाशिककरांच्या दृष्टीने ऐतिहासिक पूर ...

Now Nashik residents will get alert before the flood | आता पुराच्या आधीच नाशिककरांना मिळणार अलर्ट

आता पुराच्या आधीच नाशिककरांना मिळणार अलर्ट

Next

गोदाकाठी वसलेले शहर असल्याने नाशिककरांना पूर नवीन नाही. ९ सप्टेंबर १९६९ मध्ये आलेला महापूर हा नाशिककरांच्या दृष्टीने ऐतिहासिक पूर मानला जात होता; मात्र त्यापुढे इतका महापूर कधी झाला नव्हता; मात्र २००८ मध्ये आलेल्या महापुराने सर्व रेकॉर्ड तोडले. जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली. केवळ गोदावरीच नव्हे तर नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी या उपनद्यांनाही महापूर आला आणि शहरातील विविध भागातील संपर्क खंडित झाला होता. त्यानंतर देखील वेळाेवेळी पुराचे प्रसंग घडले असले तरी २००८ च्या पुरानंतर महापालिकेने पुराचा धडा घेतला.

२००८ मधील मुख्य पुराचे कारण म्हणजे नाशिककरांना पूर्वसूचनाच मिळालेली नव्हती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग रात्री करण्याऐवजी थेट धरण भरल्याचे लक्षात आल्यानंतर करण्यात आला असा एक आक्षेप होता. याशिवाय नदीपात्रातील पाणी किती वाढेल याचा अंंदाज नव्हता. आता याच महापुराच्या वेळी जाणवलेल्या त्रुटींच्या आधारे स्मार्ट सिटी कंपनीने प्रकल्प अहवाल तयार केला असून त्याआधारे महाआयटीच्या माध्यमातून शहरात गोदावरी, नासर्डी, वाघाडी अशा वेगवेगळ्या नद्यांना पुराची पूर्वसूचना देणारे फ्लड सेन्सॉर्स बसवण्यात येणार आहेत. त्यातील पाच सेन्सर बसवण्यात आले असून उर्वरित सेन्सर देखील लवकरच बसवण्यात येणार आहेत.

स्मार्ट सिटी कंपनी अंतर्गतच स्मार्ट अँड सेफ्टी अंतर्गत उपक्रमांतर्गत दीडशे कोटी रुपये खर्च करून प्रकल्प राबवण्यात येत आहेत.सुरक्षित शहर म्हणून सिग्नलवरील कॅमेरे बसवण्यापासून चौकाचौकात कॅमेरे आणि अन्य उपाययोजनांचा एकूण दीडशे कोटी रुपयांचा प्रकल्प असून त्याअंतर्गत राज्य शासनाची महाआयटी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत हे फ्लड सेन्सर बसवण्यात येत आहेत. शहरात नद्यांची दैनंदिन पातळी किती हे यानिमित्ताने स्मार्ट सिटीच्या कंट्रोलमध्ये कळणार असून पडणारा पाऊस आणि नदीची वाढलेली पातळी यासंदर्भातील तपशीलाच्या आधारे पुराआधीच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर तसेच रस्ते बंद करणे- वाहने वळवणे आधी कामे करण्यात येणार आहेत.

इन्फो...

या पाच ठिकाणी बसवले सेन्सर

१) गोदावरी नदीवरील पूल, रामवाडी घाट

२) मुंबई नाका येथे नासर्डी नदीच्या पुलाखाली

३) नासर्डी नदीवरील पूल,अंबड लिंकरोड, सातपूर

४) नासर्डी नदीवरील पूल, पिंपळगाव बहुला

५) वालदेवी नदीवरील पूल, विहीतगाव, नाशिकरोड

कोट...

नाशिक शहरात पुराचा धोका टाळण्यासाठी एकूण २० फ्लड सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत. त्यातील पाच बसवण्यात आले आहेत. पूर येईल तेव्हाच नव्हे तर दररोजच नदीच्या पातळीची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुरासारखी आपत्ती येण्याच्या आतच सतर्क होऊन जीवित व वित्तहानी टाळता येईल.

- सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी, नाशिक (आर फेाटोवर ११ सुमंत मोरे)

कोट...

नाशिक शहरात पुराचा धोका टाळण्यासाठी फ्लड सेन्सर बसवण्यास प्रारंभ झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात त्याचा फार उपयोग होणार नाही; मात्र पुढील पावसाळ्यापर्यंत सर्व सेन्सर बसवण्यात येतील, त्यामुळे पुराचा धोका अगोदरच लक्षात येईल.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका, नाशिक (संग्रहीत फेाटोवर वापरावा)

Web Title: Now Nashik residents will get alert before the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.