आता पाेलिसांच्या तालावर वाजणार नाशिकचे ढोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:21+5:302021-09-17T04:19:21+5:30
शहर व परिसरात ढोलवादनाची जुनी संस्कृती पाहवयास मिळते; मात्र ढोलवादनासंदर्भात कुठल्याही अधिकृत शासकिय यंत्रणेकडे ठोस माहिती किंवा कुठलीही नोंद ...
शहर व परिसरात ढोलवादनाची जुनी संस्कृती पाहवयास मिळते; मात्र ढोलवादनासंदर्भात कुठल्याही अधिकृत शासकिय यंत्रणेकडे ठोस माहिती किंवा कुठलीही नोंद नव्हती. गणेशोत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंतीसारख्या उत्सवांच्या मिरवणूकांमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळ आणि त्यांचे ढोलपथक अशीच नोंद संबंधित पोलीस ठाण्यांकडे परवानगी अर्जाच्या स्वरुपात केली जात होती. शहरातील ढोलवादनाला दिशा मिळावी आणि शासकिय स्तरावर पाठबळ उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या सूचनेनुसार आता पोलीस आयुक्तालयाकडून ढोलवादन करणाऱ्या मंडळांना लायसन्स दिले जाणार आहे. तसेच ढोलवादनासंबंधित विविध अटी, शर्तींचे पालन करत नियमावली आयुक्तालयाकडून तयार केली जाणार आहे. या नियमावलीचे पालन प्रत्येक ढोलवादन करणाऱ्या मंडळांवर आणि पथकांवर बंधनकारक राहणार आहे.
नाशिक शहरात मोठ्या संख्येने ढोलपथके, बॅन्डपथके कार्यान्वित आहेत. आतापर्यंत शहरातील कुठेही आणि कधीही ढोलपथकांद्वारे अथवा बॅन्ड पथकांद्वारे ढोल-ताशा आदी पारंपरिक वाद्य वाजविले जात होते. ढोल, ताशा आदि पारंपरिक वाद्य वाजविण्याठी आता पोलिसांकडून संबंधितांना लायसन्स घ्यावे लागणार आहे. यामुळे ढोलवादन करणाऱ्या घटकालादेखील एक अधिकृत ओळख प्राप्त होईल आणि त्यांनाही सन्मान मिळेल, असा आशावाद पाण्डेय यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
--इन्फो---
नियमावलीचा भंग केल्यास कारवाई
ढोल, ताशा आदी पारंपरिक वाद्य वाजविण्यासंदर्भात पोलीस आयुक्तालयाकडून मुंबई पोलीस कायद्यान्वये तयार करण्यात येणाऱ्या नियमावलीचे पालन करणे हे ढोलवादन करणाऱ्यांवर बंधनकारक राहणार आहे. या नियमावलीचा भंग झाल्याचे आढळल्यास पोलिसांकडून संबंधितांवर कारवाईदेखील होऊ शकते, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ढोलवादन करताना सर्वसामान्य नागरिकांना तसेच आजुबाजुच्या रहिवाशांना व रहदारीला कुठल्याहीप्रकारचा अडथळा होणार नाही तसेच गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही, याबाबतची खबरदारी संबंधितांना घ्यावी लागणार आहे.