आता ‘दंडुका’ फिरविण्याची गरज
By admin | Published: December 20, 2015 10:24 PM2015-12-20T22:24:38+5:302015-12-20T22:28:52+5:30
गुन्हेगार मोकाट : नागरिकांच्या भावना तीव्र
पंचवटी : परिसरात गेल्या काही दिवसांपासून सशस्त्र टोळक्याने डोकेवर काढण्यास सुरुवात केल्याने पोलीसही हतबल झाले आहेत. पोलिसांनी कारवाई करूनही गुन्हेगार मागे हटत नसल्याने अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलिसांना ‘दंडुका’ फिरविण्याची नितांत गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिकांत बोलले जात आहे.
कधी लूटमारीच्या इराद्याने तर कधी घातपात करण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले असले तरी प्रत्यक्षात गुन्हेगारीच्या घटना घडल्यानंतरच पोलिसांनी या संशयितांना जेरबंद केल्याचे दिसून येत आहे. हातात धारदार शस्त्रास्त्रे घेऊन उघडपणे दहशत निर्माण करणारी टोळी तसेच शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणारे टोळके आजही खुलेआम फिरत आहेत अशा संशयितांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी काही गुन्ह्यात पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढतच आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भय कायम आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यापाठोपाठ दंडुका फिरविला तर निश्चितपणे काही प्रमाणात का होईना गुंडप्रवृत्तीच्या टोळक्यावर पोलिसांना वचक बसविण्यास मदत होईल.
रात्री उशिरापावेतो सुरू असलेल्या पानटपऱ्या, हॉटेल्स, हातगाड्यांवर उभे राहणारे टोळके तसेच रात्रीच्या सुमाराला चौकाचौकात बसणाऱ्या गुंडप्रवृत्तीच्या टोळक्याविरुद्ध कारवाई सुरू केल्यास गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे पंचवटी पोलिसांना सहज शक्य
होईल. (वार्ताहर)