...आता उत्तर महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची गणना पुढच्या वर्षी
By अझहर शेख | Published: May 10, 2020 05:18 PM2020-05-10T17:18:17+5:302020-05-10T17:39:28+5:30
राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर येणा-या वन्यप्राण्यांची प्रजातीनुसार मोजदाद केली.
नाशिक : बुध्दपौर्णिमेच्या रात्री विविध अभयारण्यांसह राखीव वनक्षेत्रात पारंपरिक पध्दतीने पाणवठ्यांवर केली जाणारी वन्यप्राणी गणना यावर्षी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता राज्यभरात स्थगित केली; मात्र ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे वन कर्मचा-यांमार्फत जर वन्यप्राणी गणनेचा प्रयत्न नाशिक वनवृत्तातील नांदूरमध्यमेश्वर, कळसुबाई-हरिश्चंद्रगड, अनेर, यावल या अभयारण्यांमध्ये झाला असता, तर कदाचित उत्तर महाराष्ट्रातील वन्यजीवांची थोडीफार स्थिती लक्षात आली असती, असे मत वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
कोरोना आजाराचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी यंदा बुध्दपौर्णिमेच्या रात्री निसर्गप्रमी, वन्यजीव संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत प्राणीगणनेसाठी टाळावी आणि बुध्दपौर्णिमेच्या रात्री नियोजित असलेली वन्यप्राणी गणना स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर येणा-या वन्यप्राण्यांची प्रजातीनुसार मोजदाद केली. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कोकण विभागातील फणसाड, मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यांमध्ये वन्यजीव विभागाचा समावेश आहे. या अभयारण्यांच्या वनक्षेत्रात पाणवठ्यांवर वनरक्षकांनी मचाणवर बसून तसेच ट्रॅप कॅमेरे लावून वन्यप्राणी गणना क रण्याचा जुजबी प्रयत्न का होईना केला. यामुळे या अभयारण्यांच्या वनक्षेत्रपालांना आता पुढील वर्षभरासाठी वन्यजीव संवर्धनाबाबत आवश्यक त्या उपायोजनांचा आराखडा तयार करता येणे शक्य होणार आहे.गतवर्षीच्या प्रगणनेत १ हजार ६८६ प्राण्यांची नोंद
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वनवृत्तात येणा-या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यासह अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड, जळगाव जिल्ह्यातील पाल-यावल, अनेर डॅम या अभयारण्यांमध्ये मात्र यंदाच्या बुध्दपौर्णिमेच्या रात्री असा कु ठलाही प्रयोग वन्यप्राणी गणनेसाठी होऊ शकला नाही. कमी मनुष्यबळ व अपुरी ट्रॅप कॅमे-यांची संख्या हे कारण नाशिक वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आहे. गतवर्षीच्या प्रगणनेत १हजार ६८६ प्राण्यांची नोंद करण्यात आली. आता पुढच्यावर्षी बुध्दपौर्णिमेच्या रात्री वन्यजीव प्राणी गणना करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.