आता जुन्या संहितांवरून कलगीतुरा
By admin | Published: December 11, 2015 12:08 AM2015-12-11T00:08:45+5:302015-12-11T00:10:13+5:30
राज्य नाट्य स्पर्धा : रंगकर्मींचा नवा आक्षेप; परीक्षकांचा मात्र तथ्य नसल्याचा दावा
नाशिक : राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाचे कवित्व अद्याप सुरूच असून, स्पर्धेत सादर केलेल्या जुन्या संहितांवर परीक्षकांची वक्रदृष्टी पडल्याचा नवा आक्षेप रंगकर्मींनी घेतला आहे. परीक्षकांनी मात्र हा तो फेटाळत असे काही घडलेच नसल्याचा दावा केला आहे.
५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे त्याबद्दल नाराजी व्यक्त झाली. अनेक रंगकर्मींनी निकालावर आक्षेप घेत त्यात राजकारण असल्याचा दावाही केला. आता परीक्षकांनी जुन्या संहिता सादर करणाऱ्या रंगकर्मींच्या तोंडावरच नाराजी व्यक्त केल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे.
स्पर्धेत चं. प्र. देशपांडे लिखित ‘सामसूम’, गिरीश कर्नाड लिखित ‘हयवदन’, जयवंत दळवी लिखित ‘पुरुष’ ही जुनी नाटके सादर झाली; मात्र त्यांच्या सादरीकरणानंतर मुलाखतीच्या वेळी परीक्षकांनी ‘जुने नाटक का निवडले? नाटक जुने असल्याने ते पाहण्यात उत्सुकता राहत नाही’ अशी टिप्पणी केल्याचा दावा रंगकर्मी करीत आहेत. संहिता जुनी असल्यास पाच गुण कमी होतात; मात्र त्यापलीकडे जाऊन परीक्षकांनी नाराजी व्यक्त करणे चुकीचे असून, अशाने जुनी नाटके सादर होणारच नाही, अशी भीती रंगकर्मी बोलून दाखवत आहेत.
परीक्षकांनी मात्र या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. स्पर्धेत जुन्या व नव्या नाटकांचा समतोल हवाच. अन्यथा नव्या पिढीला जुनी नाटके पाहायला मिळणारच नाहीत. जुन्या संहितांविषयी परीक्षकांनी कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नसून, निकालानंतर अशा प्रकारचे दावे करणे हे अपरिपक्वपणाचे लक्षण असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.