पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार वन्यजीवांवर अद्ययावत उपचार; ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरचे बांधकाम पूर्ण
By अझहर शेख | Published: August 12, 2023 04:50 PM2023-08-12T16:50:26+5:302023-08-12T16:51:17+5:30
वन्यजीवांचे संवर्धन काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन नाशिक वनविभागाने वन्यप्राण्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी अद्ययावत सुसज्ज अशा उपचार केंद्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय २०२० साली घेतला होता.
नाशिक : मागील अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा असलेले वन्यप्राणी उपचार केंद्र (ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर) म्हसरूळला नाशिक पश्चिम वनविभागाने साकारले आहे. पुण्यातील उपचार केंद्राच्या धर्तीवर नाशिकमध्ये जखमी वन्यप्राण्यांवर उपचाराचा मार्ग खुला झाला आहे. या महिनाअखेर केंद्राचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
वन्यजीवांचे संवर्धन काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन नाशिक वनविभागाने वन्यप्राण्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी अद्ययावत सुसज्ज अशा उपचार केंद्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय २०२० साली घेतला होता. २०२१ साली या केंद्राचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्धतेसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आणि साडेचार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
उत्तर महाराष्ट्रातील पहिले वन्यप्राणी उपचार केंद्र उभारणीच्या भूमिपूजनाचा नारळ ४ ऑक्टोबर २०२१ साली तेव्हाचे व आताचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फोडण्यात आला होता. सुमारे २० महिन्यांपासून हे काम सुरू असून आता लवकरच लोकार्पण व्हावे, अशी वन्यप्राणीप्रेमींनी अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘लोकमत’कडून सातत्याने या केंद्रासाठी पाठपुरावा केला जात आहे. वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करत सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न लोकमतने केला. दोन एकर जागेत या केंद्राची सुसज्ज इमारत साकारण्यात आली आहे. दरम्यान, बांधकाम पूर्णत्वास आले असून लोखंडी पिंजऱ्यांचे कक्षही पूर्ण झाले आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक, वन्यजीव नागपूर कार्यालयाने केलेल्या सूचना व त्यानंतर मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सुचविलेल्या काही लहान बदल व केलेल्या सूचनांनुसार अंतिम टप्प्यात कामे पूर्ण केली जाणार आहेत.
अशा असणार पायाभूत सुविधा
या वन्यप्राणी उपचार केंद्रात शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता कक्ष, एक्स-रे कक्ष, एमआरआय कक्ष, निरीक्षण कक्ष, औषधालय, खाद्य भांडार आदी सुविधांसह प्रशिक्षित कुशल असा वन्यजीवांवर ुउपचार करणारा वैद्यकीय चमू उपलब्ध राहणार आहे.
वाघासाठी १ कक्ष
बिबट्यांसाठी ४ कक्ष
लांडगे, कोल्ह्यांसाठी- ५ कक्ष
माकड,वानरांसाठी-२ कक्ष
पक्ष्यांकरिता २४ कक्ष