आता एका प्रभागात एकच नगरसेवक
By admin | Published: January 30, 2015 12:20 AM2015-01-30T00:20:47+5:302015-01-30T00:21:02+5:30
बहुसदस्यीय प्रभाग रद्द : निवडणूक आयोगाचा निर्णय महापालिकेला प्राप्त; निवडणुकीची तयारी थांबविली
नाशिक : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन वर्षे बाकी असतानाच आता द्विसदस्यीय प्रभागपद्धती रद्द करून एका प्रभागात एकच नगरसेवक अशी पद्धती पुन्हा अमलात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे पत्र महापालिकेला गुरुवारी प्राप्त झाले. त्यामुळे द्विसदस्यीय पद्धतीप्रमाणेच आगामी निवडणुकीसाठी सुरू करण्यात आलेली तयारी थांबविण्यात आली आहे.
२०१२ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभाग पद्धती अमलात आणण्यात आली होती. त्यामुळे सध्या शहरात ६१ प्रभाग असून, १२२ नगरसेवक आहेत. तत्पूर्वी २००२ मध्ये झालेल्या महापालिकांमध्ये निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात होती.
एका पेक्षा अधिक सदस्य असलेल्या प्रभाग पद्धतीमुळे अनेकदा नगरसेवकांमधील वादाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्याचा विचार करून अशाप्रकारे अनेकदा बदलही करण्यात आले आहेत. परंतु आता राज्य निवडणूक आयोगानेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धती बंद करून एक प्रभाग एक सदस्य अशी पद्धत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
८ जानेवारी २०१५ रोजी यासंदर्भातील अवर सचिव नि. ज. वागळे यांच्या सहीचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यात एका प्रभागात एक सदस्य अशी पद्धत अमलात आल्याने बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका या आधी २०१२ मध्ये झाल्याने आता २०१७ मध्ये पुढील निवडणुका होणार आहेत. या बदलामुळे महापालिका प्रभागाची संख्या आता वाढणार आहे. तथापि, नगरसेवकांची संख्य मात्र तीच राहील, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)