आता पर्यायी शाहीमार्गालाही विरोध
By admin | Published: January 8, 2015 12:42 AM2015-01-08T00:42:07+5:302015-01-08T00:42:21+5:30
ग्रामउत्सव समिती : बैठक त्वरित बोलावण्याची केली मागणी
नाशिक : कुंभमेळ्यातील शाहीमार्गासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता गणेशवाडीतील पर्यायी शाहीमार्गाचा स्वीकार करण्याची तयारी सुरू आहे. तथापि, दुसरीकडे मात्र या चर्चेमुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे सिंहस्थ ग्रामउत्सव समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात तातडीने प्रशासनाने बैठक बोलवावी आणि त्यात ग्रामउत्सव समितीला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
गेल्या तीन कुंभमेळ्यापासून पंचवटीकरांनी सिंहस्थ ग्रामोदय समितीची स्थापना केली आहे. या समितीत पंचवटीतील सामजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विद्यमान खासदार या समितीचे अध्यक्ष असतात. त्या निकषाने सध्या खासदार हेमंत गोडसे हे अध्यक्ष आहेत. पंचवटी हे कुंभमेळ्याचे मूळ स्थान आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी सेवाभावी वृत्तीने सामिल होऊन कार्यरत राहावे असे समितीचे धोरण आहे. परंतु शासन आणि प्रशासनाने तर महाउत्सवात पंचवटीकरांचा सहभागच नष्ट केला आहे. आता पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या उत्सवाच्या पद्धतीलाही बदलण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. शाही मिरवणुकीच्या मार्गातील बदल हा त्यातीलच एक भाग असल्याचे समितीने म्हटले आहे.
पारंपरिक शाहीमार्गावर मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात गेलेला भाविकांचा बळी ही दुर्दैवी बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी म्हणजेच शाहीमार्गात केलेले बदल बघता प्रशासनाने आपले अपयश मान्य केल्यासारखेच असल्याचे समितीचे म्हणणे आहे. परंतु पारंपरिक शाहीमार्गावर काही प्रमुख धार्मिक स्थळे, पौराणिक मंदिरे व साधू-महंतांचे आखाडे आहेत. त्यामुळे या मार्गाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. साधू-महंतांच्या व समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक वर्षापूर्वी चर्चा झाली. त्यावेळी शाही मिरवणुकीचा मार्ग, शाहीस्नानाचे स्थान व कुंभमेळ्याच्या जागा यात कोणत्याही प्रकारे बदल केला जाणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे कोणत्याही प्रशासकीय कामांमध्ये समितीने कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही, असे नमूद करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र शाहीमार्गामध्ये बदल करण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता व विरोध होत आहे. त्याकरिता प्रशासनाने कोणत्याही निर्णयाच्या अंतिम टप्प्यात जाण्याआधी समितीशी संवाद साधणे गरजेचे आहे.
यासंबंधात समितीची बैठक पुढील सप्ताहात बोलावण्यात आली असून, त्यावेळी पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे कार्याध्यक्ष भगवान भोगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)