आता राज्यराणी एक्स्प्रेसही पळविली नांदेडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:12 AM2019-12-18T01:12:25+5:302019-12-18T01:13:32+5:30
मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेड-मुंबई अशी चालविण्यास रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याने मुंबई-ठाणे जाणाऱ्या नाशिककर रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तपोवन, नाशिक-पुणे एक्स्प्रेस व आता राज्यराणी एक्स्प्रेसचादेखील मार्ग वाढविल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
नाशिकरोड : मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेड-मुंबई अशी चालविण्यास रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याने मुंबई-ठाणे जाणाऱ्या नाशिककररेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तपोवन, नाशिक-पुणे एक्स्प्रेस व आता राज्यराणी एक्स्प्रेसचादेखील मार्ग वाढविल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई-ठाणे परिसरात दररोज ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या वाढल्याने पंचवटी एक्स्प्रेसला समांतर रेल्वे सुरू करण्याची नाशिककर प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी होती. ९ मार्च २०१२ रोजी मनमाड-एलटीटी राज्यराणी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनंतर राज्यराणी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत धावत आहे. मात्र राज्यराणी एक्स्प्रेसला दादरला थांबा देण्यात यावा व तिची परतीची वेळ बदलण्यात यावी या मागणीकडे रेल्वे मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे नाशिककर रेल्वे प्रवाशांची दादर थांबा नसल्याने व वेळेमुळे परतीची गैरसोय तशीच आहे. राज्यराणी एक्स्प्रेस तोट्यात असल्याच्या कारणावरून यापूर्वीच राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई करण्याचा रेल्वे मंत्रालयाकडून घाट घालण्यात आला होता. मात्र खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप, अनिल कदम यांनी राज्यराणी ही मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, अशी मागणी लावून धरली होती. नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई सोडावी, अशी मागणी केली होती. राज्यराणी एक्स्प्रेस तोट्यात असल्याचे कारण पुढे करून रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई धावण्यास सोमवारी (१६ डिसेंबर) मंजुरी दिली आहे. राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडकडूनच हाउसफुल्ल होऊन आल्यास नाशिककर रेल्वे प्रवाशांना त्यामध्ये जागा मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसवरील प्रवाशांचा ताण वाढणार आहे. यामुळे नाशिककर रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
तपोवन एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर मनमाड-सीएसटी अशी धावत होती. मात्र काही वर्षानंतर नाशिककरांकडून तपोवन एक्सप्रेस हिरावून घेत ती नांदेड-मुंबई करण्यात आली. काही वर्षांपूर्वी नाशिक-पुणे गाडी सुरु करण्यात आली. या गाडीला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता ती भुसावळहून सोडली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तांत्रिक कामामुळे भुसावळ-पुणे एक्स्प्रेस ही नाशिक ऐवजी मनमाड-दौंडमार्गे धावत आहे. यामुळे नाशिककरांना पुण्याला रस्तामार्गे जाण्याची वेळ आल्याने पैसे व वेळेचा अपव्यय होत आहे.