आता मृत्यूभोवतीही संशयाचा फेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:50+5:302021-04-28T04:15:50+5:30
लग्नसमारंभ आणि अंत्यविधीला होणारी गर्दी ही कोराेना संक्रमणासाठी पूरक ठरत असल्याने शासनाने याठिकाणी जमणाऱ्या गर्दीवर निर्बंध लादले आहेत. त्याचे ...
लग्नसमारंभ आणि अंत्यविधीला होणारी गर्दी ही कोराेना संक्रमणासाठी पूरक ठरत असल्याने शासनाने याठिकाणी जमणाऱ्या गर्दीवर निर्बंध लादले आहेत. त्याचे पालन होणे आवश्यकही आहे. परंतु, ग्रामीण भागात अंत्यविधीसाठी कुणी पुढे येत नसल्याच्याही घटना घडू लागल्याने पेच उभे राहत आहेत. देवळा तालुक्यातील मेशी गावात अशीच एक घटना घडली. एका वृध्द महिलेचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. या महिलेला तीन मुले आणि एक मुलगी आहे. एक महिन्यापूर्वी आजीबाईच्या एका मुलाचे निधन झाले तर एक मुलगा कामानिमित्त पुणे येथे तर दुसरा मुलगा नाशिकला राहतो. आजीबाई मेशी येथे भाड्याच्या खोलीत एकट्याच राहात होत्या. मेशी गावातही कोरोना महामारीचे संकट गडद आहे. अशावेळी आजीबाईचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे उत्तर शोधण्याऐवजी तिच्या अंत्यविधीसाठी कुणीही पुढे येत नव्हते. अशावेळी मेशीचे उपसरपंच भिका बोरसे, ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिंदे आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पुढाकार घेत आजींचा अंत्यसंस्कार पार पाडला. यासाठी आजीचे चार नातेवाईक खांदा देण्यासाठी बोलावण्यात आले होते. या घटनेतून अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन घडले. तर कोरोनाचा गावकऱ्यांनी किती धसका घेतला आहे, याचाही प्रत्यय आला.