आता भाजपात ‘राम’ राहिला नाही म्हणून...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:13 AM2021-07-26T04:13:54+5:302021-07-26T04:13:54+5:30
निवडून येण्याची शक्यता नाही, आहे असे दिसले नाही की आयाराम गयारामांची पक्षांतरे सुरू होतात. भाजपातील संघर्ष आणि निमित्त ...
निवडून येण्याची शक्यता नाही, आहे असे दिसले नाही की आयाराम गयारामांची पक्षांतरे सुरू होतात. भाजपातील संघर्ष आणि निमित्त शाेधून बाहेर
पडण्यासाठी जो खेळ सुरू आहे, तो याच प्रकारातील आहे. प्रभाग समितीच्या
निवडणुकीत झालेली गद्दारी हे केवळ निमित्त मात्र. त्याचे परिणाम मात्र
येत्या काही महिन्यात दिसतील. अर्थात, हे भाजपला ठाऊक नाही अशातला भाग
नाही, परंतु एकंदरच गेल्या काही वर्षांपासून भाजपात ‘नेते’ खूप झाले, परंतु
‘नेतृत्व’ नाही अशी अवस्था झाली आहे. बरे तर साऱ्यांचा स्वारस्याचा विषय एकच नाशिक महापालिका! पक्षात
नेते असूनही पक्षाला जी
‘निर्णायकी’ अवस्था प्राप्त झाली ती बघता या पक्षाची वाटचाल वेगळ्या
धेाक्याच्या वळणावर आली आहे हेच खरे!
नाशिक महापालिकेत मुळात भाजपची सत्ता आली तीच उधार उसनवारीवर! मात्र, सर्व पक्षातून आलेले उमेदवार ही सूज न मानता पक्षाचे वाढलेले बळ आहे, असे समजून नेत्यांनी बेटकुळ्या फुगावल्या; मात्र दुसरीकडे ६६ पैकी अवघे नऊ
नगरसेवक पक्षाचे निष्ठावान आणि जुने बाकी सर्व आयाराम असल्याने पक्षाला
आयारामांना महत्त्वाची सत्तापदे देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पक्षातील
निष्ठावान अनुभवी असल्याने दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना सर्वच मोक्याची
पदे मिळत गेली. येणारे बहुतांशी सत्ता बघूनच आल्याने त्यांच्यातही आपसात
वाद हाेत राहिले. बऱ्याच जणांची पदे भाेगून झाल्याने त्यांना भाजपात ‘राम’
राहिलेला दिसत नाही. त्यातच राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर महापालिकेतील
संभाव्य सत्ता समीकरणे बदलण्याचा राजकीय भाकीत मांडून अनेक जणांना ज्या
पक्षाची सत्ता येईल असे वाटते त्या पक्षाकडे येण्याचे वेध लागले आहेत.
यापूर्वीचे ताजे उदाहरण मनसेचे होते. पक्षाची अवस्था बिकट होऊ लागताच,
बहुतांशी नगरसेवकांनी भाजप, सेनेत उडी घेतली. त्याचीच पुनरावृत्ती भाजपात हाेत आहे.
प्रभाग समितीच्या निवडणुकीत फुटल्याचा आरोप असलेल्या नगरसेवकांपैकी डॉ. सीमा ताजणे या मूळच्या शिवसेनेच्या आणि विशाल संगमनेरे पक्षाचे निष्ठावान म्हणतील, पण ते निवडणूक भाजपाकडून लढवतील याची खात्री नाही. बरेच जण पक्षांशी पंगा घेऊन कारवाईची वाट बघत आहेत. बाहेर पडण्यासाठी फक्त ते निमित्त ठरेल. मध्यंतरी एका ज्येष्ठ नगरसेवकाने आपल्याच पक्षाच्या
महापौरांचाच राजीनामा मागितला; मात्र बाहुबली नगरसेवकाला नोटीस काढायचे भाजपाच्या सुकाणू समितीत ठरूनही नाेटीस काढण्याचे कोणाचेही धाडस झालेले नाही. पक्षातील नवे गट प्रस्थापित होत असून प्रदेश पातळीवरील नेत्यांचे आशीर्वाद असल्याने अशा गटांना रोखण्याची मूळ भाजप नेत्यांची हिम्मत राहिलेली नाही.
या सर्व तळाशी जे राजकारण आहे, ते देखील स्थानिक विरुद्ध बाहेरून
आलेल्या आजी माजी आमदारांमधील आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ हा सध्या पक्षाला जाणवणाऱ्या हादऱ्यांचा केंद्रबिंदू आहे. एक आजी, एक माजी आणि एक भावी आमदार मानले जाणाऱ्यातील ही लढाई पूर्ण पक्षाला वेठीस धरत आहे.
त्यामुळे पक्ष सोडून जाणारे जाणारच आहेच परंतु
पक्षाला किंमत मोजावी लागेल इतकेच!
- संजय पाठक