सिव्हीलच्या प्रत्येक भागावरआता तिसऱ्या डोळ्याची नजर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:17+5:302021-01-22T04:14:17+5:30
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालय जनसामान्यांसाठी २४ तास खुले असल्याने येथे येण्यास कोणालाही बंदी नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या ...
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालय जनसामान्यांसाठी २४ तास खुले असल्याने येथे येण्यास कोणालाही बंदी नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना किंवा अपप्रकार घडू नयेत या उद्देशाने जिल्हा रुग्णालयात अजून ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. या सीसीटीव्हीमुळे जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक बाबीवर प्रशासनाला नजर ठेवता येणार असून, कोणत्याही प्रसंगी तत्काळ उपाययोजना करण्यासदेखील या तिसऱ्या डोळ्यातून दिसणाऱ्या चित्रणाचा उपयोग करता येणार आहे.
जिल्हा रुग्णालयात यापूर्वीच वेगवेगळ्या विभागांमध्ये ३७ सीसीटीव्ही बसवून कार्यरत करण्यात आले होते. मात्र, त्यातील काही सीसीटीव्ही तांत्रिक कारणास्तव बंद पडल्याने त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना दुरुस्त करण्यासह नवीन ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक कक्षात तसेच संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्येदेखील हे सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाची दोन्ही मुख्य दिवसभर उघडेच असतात. हॉस्पिटलचा परिसर मोठा असल्याने प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवणेही शक्य नसून हॉस्पिटलच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही घातक प्रकार घडू नयेत, यासाठीदेखील हे सीसीटीव्ही उपयुक्त ठरणार आहेत. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेला प्रकार तसेच मध्यंतरी नाशिक सिव्हीलमध्ये घडलेल्या झुरळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरदेखील हे सीसीटीव्ही उपयुक्त ठरणार आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाहनांचीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. मात्र, काही प्रसंगात एकाच वेळेस रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकालादेखील आत येण्यास व थांबण्यास दाटीवाटी होते. तसेच काही प्रसंगांमध्ये नातेवाईक गमावल्याने रुग्ण आणि कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंग घडतात. अशावेळीदेखील संबंधित विभागात किंवा कॉरिडॉरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन प्रसंग हाताळणे सोयीस्कर होऊ शकणार आहे.
इन्फो
कामकाजावर देखरेख
जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक विभागात चालणाऱ्या नित्य कामकाजावरदेखील सीसीटीव्हीमुळे नजर ठेवता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही विभागात नियमबाह्य वर्तन तसेच अन्य कुणाही रुग्णाच्या नातेवाइकांना नियमबाह्य वर्तन करण्यावर आपोआपच निर्बंध येणार आहेत. तसेच घडलेल्या कोणत्याही घटनेची बारकाईने नजर ठेवता येणार आहे.
कोट
प्रत्येक भागावर लक्ष शक्य
जिल्हा रुग्णालयात यापूर्वीच ३७ सीसीटीव्ही कॅमेरे होते. आता नवीन ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक भागावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. तसेच रुग्ण आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील ते उपयुक्त ठरणार आहेत.
डॉ. रत्ना रावखंडे , जिल्हा शल्य चिकित्सक
फोटो
२१सीसीटीव्ही
जिल्हा रुग्णालयातील कॉरिडॉरमध्ये लावण्यात येत असलेले सीसीटीव्ही.