मनपा रुग्णालयात आता रुग्णांचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ संगणकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 01:13 AM2019-05-26T01:13:40+5:302019-05-26T01:15:11+5:30
महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सर्व नोंदणी, त्याला दिली जाणारी औषधे तसेच करण्यात येणाºया तपासण्या या सर्वांची नोंद आता संगणकावर नोंदवली जाणार आहे.
नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सर्व नोंदणी, त्याला दिली जाणारी औषधे तसेच करण्यात येणाºया तपासण्या या सर्वांची नोंद आता संगणकावर नोंदवली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते काय आणि त्यांनी काय तपासणी केली येथून ते औषधे कोणती दिली आणि साठा असून, नाही सांगितला काय इतकेच नव्हे तर सोनोग्राफी, एक्स-रे तपासणी केली किंवा कसे याबाबतची सर्व माहिती आॅनलाइन करणार आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून ही व्यवस्था होणार आहे.
महापालिकेचा वैद्यकीय विभाग असाच तंत्रज्ञानापासून दूर असल्याने त्यात सावळा गोंधळ असतो. रुग्णांच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविषयी तक्रारी, औषधांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत हे महापालिकेतील नेहमीचेच मुद्दे असतात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी दोनशे संगणक संचाची मागणीदेखील नोंदविण्यात आली आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर त्याची नोंदणी होईल. संबंधित वैद्यकीय अधिकाºयाकडे गेल्यानंतर त्याची होणारी तपासणी, केलेले उपचार आणि औषधे याची नोंद संबंधित वैद्यकीय अधिकारी आपल्या संगणकावर करेल. वैद्यकीय अधिकाºयाने त्या रुग्णास सोनोग्राफी किंवा एक्स-रे काढण्यास सांगितले की, तशी नोंद त्याला संगणकावर करावी लागेल आणि त्यानंतर महापालिकेच्या संबंधित क्ष किरण तज्ज्ञ किंवा रेडिओलॉजीस्टच्या संगणकावर याबाबतची माहिती दिसेल त्या अनुषंगाने तो तपासणी करेल अन् त्याचीदेखील नोंद होईल. त्याचप्रमाणे औषधांचीदेखील माहिती संगणकावर असेल.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांच्या कामकाजाबाबत नगरसेवकांच्या तक्रारी असून, ते कार्यालयात उपलब्ध नसतात किंवा रुग्ण अन्यत्र पाठवले जातात, त्यासाठी अनेक प्रकारची कारणे दिली जातात. परंतु आता मात्र रुग्ण आल्यानंतर त्याला नक्की काय झाले, आजार किती गंभीर होता म्हणून सुविधा असलेल्या महापालिकेच्या अन्य किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या सर्वांचीच माहिती उपलब्ध असणार आहे. अर्थात, हे आधुनिकीकरण करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कितपत साथ देतात, यावर त्याचे यश अवलंबून आहे.