आता टर्नओव्हर टॅक्सलाही विरोध
By admin | Published: November 2, 2014 11:36 PM2014-11-02T23:36:42+5:302014-11-02T23:37:05+5:30
उद्या फामची बैठक : मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
नाशिक : व्यापारीवर्गाचा विरोध असलेला स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी हटविण्याची तयारी नव्या राज्य सरकारने केली आणि त्याला पर्याय म्हणून टर्नओव्हर टॅक्स आणणयाचे ठरविले; परंतु व्यापाऱ्यांची शीर्ष संघटना असलेल्या फामचा या दोन्ही करांना विरोध आहे. त्यासंदर्भात मंगळवारी (दि. ४) मुंबई येथे फामच्या बैठकीत एलबीटीच्या विरोधात अंतिम एल्गार पुकारला जाणार आहे. त्यानंतर दुपारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी सुरू आहे.
गेल्या वर्षीपासून राज्यात मुंबई वगळता सर्वत्र जकात रद्द करून त्याला पर्याय असलेला एलबीटी लागू करण्यात आला. उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सने त्याला फारसा विरोध केला नाही; मात्र व्यापाऱ्यांनी त्यास सुरुवातीपासूनच कडक विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. अनेकदा त्यावर आंदोलने करण्यात आली. आघाडी सरकार हा कर हटवू न शकल्याने व्यापाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यस्तरावर सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर आघाडी सरकारने हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात फारसे यश आले नाही. त्यामुळे त्यांनी महापालिकांनाच जकात की एलबीटी याचा पर्याय देण्याचे जाहीर केले. त्यामुळे व्यापारी पुन्हा संतप्त झाले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने व्यापाऱ्यांना सत्ता आल्यास रद्द करू असे आश्वासन दिलेच; परंतु मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर त्यांनी तातडीने एलबीटी रद्द करतानाच टर्नओव्हर टॅक्स लागू करण्याचा विचार असल्याचे जाहीर केले.
नवीन सरकार आल्याने आता एलबीटी तातडीने रद्द करावा या मागणीसाठी फामची महत्त्वाची बैठक मंगळवारी (दि. ४) नवी मुंबईतील वाशी येथे होणार आहे. २६ महापालिकांमधील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असून, यावेळी एलबीटी तातडीने रद्द करावा अशी मागणी केली जाणार आहे. बैठकीनंतर दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अर्थात, एलबीटी रद्द करताना अन्य कोणताही पर्यायी कर लावण्यास फामचा विरोध आहे, असे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले. त्यामुळे एलबीटीच्या विरोधापाठोपाठ प्रस्तावित टर्नओव्हर टॅक्सलाही विरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)